इस्लामाबाद : पश्चिम आशियातील संघर्ष सोडवण्यासाठी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. या चर्चेदरम्यान इराणचा विश्वास संपादन करण्यात अमेरिकेला अपयश आल्याचे मुख्य इराणी वाटाघाटीकार मोहम्मद बागेर गालीबाफ यांनी रविवारी सांगितले. इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे संसदेचे अध्यक्ष गालीबाफ यांनी दोन्ही बाजूंमध्ये करार होऊ शकला नसल्याचे स्पष्ट केले.
इराणने या चर्चेत सकारात्मक पुढाकार घेतला होता, मात्र समोरच्या बाजूने या फेरीमध्ये इराणचा विश्वास जिंकला नाही, असे गालीबाफ यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नमूद केले. ‘गेल्या दोन युद्धांच्या अनुभवामुळे आमचा समोरच्या पक्षावर विश्वास नसल्याचे मी चर्चेपूर्वीच स्पष्ट केले होते. अमेरिकेला आता आमचा तर्क आणि तत्त्वे समजली असून, आमचा विश्वास संपादन करायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असल्याचेही गालीबाफ यांनी सांगितले. इराणी लोकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी लष्करी बळासोबतच शक्तिशाली मुत्सद्देगिरीवर आपला विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इराण अण्वस्त्र कार्यक्रम सोडण्यास तयार नसल्याने चर्चा फिसकटली -व्हान्स
अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी ही चर्चा शांतता करारापर्यंत पोहोचू शकली नसल्याचे सांगितले. इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सोडण्यास नकार दिल्याने चर्चा फिसकटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही आमची अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर असल्याचे सांगत, व्हान्स यांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.
इराणच्या संसदेचे उपाध्यक्ष हाजी बाबाई म्हणाले की, होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण आहे. येथून जाणाऱ्या जहाजांना इराणचे चलन रियालमध्ये टोल द्यावा लागणार आहे.
होर्मुझची नाकेबंदी - ट्रम्प यांची घोषणा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची ये-जा रोखण्यासाठी ‘तत्काळ’ नाकेबंदी सुरू करणार असल्याचे जाहीर केले. सर्व जहाजांना सुरक्षित प्रवास करायला मिळावा याचा उद्देश आहे. जी जहाजे इराणला टोल देतील, अशा आंतरराष्ट्रीय जलसीमांवरील प्रत्येक जहाजाला रोखण्याच्या सूचना नौदलाला दिल्या आहेत.