Iran vs US-Israel War : होर्मुझवर इराणची घट्ट पकड, युद्ध आणखी भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता 
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : होर्मुझवर इराणची घट्ट पकड, युद्ध आणखी भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता

इराण आणि अमेरिका यांच्यातील पेचप्रसंग गुरुवारी अधिक गडद होताना दिसला. चर्चेच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी आपली भूमिका अधिक ताठर केली असून, मध्यपूर्वेतील युद्धात आणखी एक मोठी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Swapnil S

दुबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील पेचप्रसंग गुरुवारी अधिक गडद होताना दिसला. चर्चेच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी आपली भूमिका अधिक ताठर केली असून, मध्यपूर्वेतील युद्धात आणखी एक मोठी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हजारो अतिरिक्त अमेरिकन सैन्य या क्षेत्राच्या दिशेने कूच करत असताना, तेहरानने अत्यंत महत्त्वाच्या अशा होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण अधिक मजबूत केले आहे.

इस्रायलमध्ये इराणकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे धोक्याचे सायरन वाजत आहेत, तर आखाती देश हे हल्ले हवेतच रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इराणची राजधानी आणि इतर शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे वृत्त आहे.

हे युद्ध आता ‘कोण जास्त हानी सोसू शकते’ या मुद्दयावर येऊन ठेपले आहे. अमेरिकेने आपली उद्दिष्टे वेळोवेळी बदलली असली तरी ती अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. यामध्ये इराणचे क्षेपणास्त्र आणि अणु कार्यक्रम यापुढे धोका ठरणार नाहीत याची खात्री करणे आणि प्रादेशिक सशस्त्र गटांना तेहरानकडून मिळणारा पाठिंबा संपवणे यांचा समावेश आहे. वॉशिंग्टनने एका टप्प्यावर इराणमधील ‘थियोक्रसी’ (धार्मिक राजवट) उलथून टाकण्याचाही प्रयत्न केला होता.

अमेरिका आणि इस्रायलच्या मोहिमेने इराणच्या लष्करी आणि सरकारी यंत्रणेला मोठा तडाखा दिला असून, अनेक वरिष्ठ नेत्यांना ठार केले आहे आणि शेकडो लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. तरीही इराणकडून क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच आहे आणि सरकारविरुद्ध उठाव झाल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.

दुसरीकडे, इराणच्या नेतृत्वासाठी केवळ या हल्ल्यांतून स्वतःला टिकवून धरणे हाच एक विजय मानला जाऊ शकतो.

इराणला कदाचित अशी आशा आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवून जागतिक अर्थव्यवस्थेला खिळ बसवल्यामुळे अमेरिका माघार घेईल. यामुळे जगभरातील इंधनाचे दर, किराणा मालाचे भाव आणि व्यवसायांवरील खर्च प्रचंड वाढला आहे. एका आखाती अरब गटाने गुरुवारी सांगितले की, इराण जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ‘टोल’ (शुल्क) वसूल करत आहे.

अमेरिका आणि इराण या दोघांनीही आपल्या मागण्यांची यादी सादर केली आहे, परंतु सध्या कोणताही तोडगा निघताना दिसत नाही. वाटाघाटी यशस्वी न झाल्यास, इराणचे हल्ले थांबवण्यासाठी आणि तेलाचा मुक्त प्रवाह पूर्ववत करण्यासाठी अमेरिकेला युद्धाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल.

आणखी एक हत्या

सामुद्रधुनीवरील पेचप्रसंग सोडवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, इस्रायलने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नौदल प्रमुखाला, कमोडोर अलीरेझा तांगसिरी यांना ठार केल्याचा दावा केला आहे. इराणने या हत्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सेवानिवृत्त झालेल्या महिलेचा पेन्शनवरील हक्क कायम; उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Tiger Shroff Firing: हल्ल्यात वापरलेली दुचाकी संशयाच्या भोवऱ्यात; मालकी हस्तांतरणाची अधिकृत नोंद नाही

Navi Mumbai: कांदळवनात फेकली ब्रँडेड दूध, दह्याची १०० पाकिटे; FDA च्या कारवाईच्या भीतीने पाकिटे फेकल्याची शक्यता

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार! गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट

अन्य देशांच्या आंदोलनाशी तुलना नको - अभिजीत दिपके