तेहरान : इराणमधील धर्मसत्तेला आव्हान देणारी जोरदार निदर्शने सुरू असून अनेक शहरांत हिंसाचार पसरला आहे. या हिंसाचारात किमान २०३ जणांचा मृत्यू झाला असून २६०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, जर आमच्यावर हल्ला झाल्यास अमेरिका व इस्रायली सैन्य दलांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.
इराणमध्ये इंटरनेट सेवा आणि दूरध्वनी सेवा खंडित असल्याने परदेशातून या निदर्शनांचा अंदाज घेणे अधिक कठीण झाले आहे. मात्र मृतांचा आकडा वाढतच असून, अमेरिकास्थित ‘ह्युमन राइट्स ॲॅक्टिव्हिस्ट्स न्यूज एजन्सी’नुसार हजारो जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिलेल्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालीबाफ यांनी अमेरिकन सैन्य आणि इस्रायलला ‘लक्ष्य’ ठरवण्याचा इशारा दिला. इराणच्या जनतेने हे जाणून ठेवावे की आम्ही त्यांच्याशी अत्यंत कठोरपणे वागू आणि अटक झालेल्यांना शिक्षा करू.
इराणवर हल्ला झाल्यास इस्रायली तसेच या भागातील सर्व अमेरिकी लष्करी केंद्रे, तळ आणि जहाजे आमची लक्ष्य असतील, असे कालीबाफ म्हणाले. हल्ल्यानंतरच प्रत्युत्तर देण्यापुरते आम्ही स्वतःला मर्यादित मानत नाही; कोणत्याही धोका दर्शविणाऱ्या वस्तुनिष्ठ चिन्हांवर आधारित कारवाई करू’, असा इशारा कालीबाफ यांनी दिला.
इराणवर हल्ल्याचा प्लॅन ट्रम्पना सादर
‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने नाव न सांगणाऱ्या अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले की, इराणवर हल्ल्याचे लष्करी पर्याय ट्रम्प यांना सादर करण्यात आले असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वतंत्र इशारा देत म्हटले, ‘अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी खेळ करू नका. ते काही करणार असल्याचे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ तसाच असतो.’