बैरूत: इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील क्रुसेडर-कालीन किल्ला आपल्या ताब्यात घेतला आहे. गेल्या पाऊण शतकाहून अधिक काळातील ही लेबनॉनमधील त्यांची सर्वात मोठी घुसखोरी असल्याचे लष्कराने रविवारी सांगितले.
नबातीयेह शहराजवळील ब्युफोर्ट किल्ल्यावर मिळवलेले हे नियंत्रण, आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक दिवस चाललेल्या तीव्र लढाई आणि हवाई हल्ल्यानंतर मिळाले आहे. या दुर्गम भागात इस्रायली सैन्य आणि हिजबुल्लाहच्या लढवय्यांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता.
मार्चच्या सुरुवातीला सुरू झालेल्या ताज्या इस्रायल-हिजबुल्लाह युद्धातील इस्रायलसाठी हा एक मोठा विजय मानला जात आहे.
१७ एप्रिलपासून नावापुरती युद्धबंदी लागू असतानाही इस्रायलने ही आगेकूच केली आहे. २ आणि ३ जून रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात दोन्ही देशांदरम्यान पुढील फेरीची चर्चा होणार असतानाच ही कारवाई झाली आहे.
इस्रायली लष्कराचे अरबी प्रवक्ते अविचाय अद्राई यांनी 'X' वर एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ज्यात इस्रायली सैनिक किल्ल्याच्या बाहेर चालताना दिसत आहेत. तसेच संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ‘एक्स’वर लिहिले की, त्यांनी किल्ल्यावर इस्रायलचा ध्वज फडकवला आहे.
लष्करी कारवाईचा विस्तार
इस्रायली लष्कराने म्हटले की, त्यांनी काही दिवसांपूर्वी ब्युफोर्ट रिज आणि दक्षिणेकडील सुलुकी खोऱ्यात हिजबुल्लाहची पायाभूत यंत्रणा उद्ध्वस्त करण्याच्या आणि ‘इस्रायली नागरिकांवरील थेट धोके’ दूर करण्याच्या उद्देशाने मोहीम सुरू केली होती.