कोहिनूर हिरा परत करा; झोहरान ममदानी करणार राजे चार्ल्स यांना विनंती 
आंतरराष्ट्रीय

कोहिनूर हिरा परत करा; झोहरान ममदानी करणार राजे चार्ल्स यांना विनंती

ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची संधी मिळाल्यास आपण कोहिनूर हिरा परत करण्याची गळ घालू, असे न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी स्पष्ट केले आहे.

Swapnil S

न्यूयॉर्क : ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करण्याची संधी मिळाल्यास आपण कोहिनूर हिरा परत करण्याची गळ घालू, असे न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी स्पष्ट केले आहे.

बुधवारी शहरात ब्रिटिश सम्राटांची भेट घेण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममदानी म्हणाले, जर मला राजांशी स्वतंत्रपणे बोलायची संधी मिळाली, तर मी त्यांना कोहिनूर हिरा परत करण्यास नक्कीच सांगेन. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राजा चार्ल्स दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांना राजांना काय सांगाल, असा प्रश्न ममदानी यांना विचारण्यात आला होता.

बळींना श्रद्धांजली

मंगळवारी किंग चार्ल्स यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित केले. व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणात किंग चार्ल्स आणि राणी कॅमिला यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर किंग चार्ल्स आणि राणी कॅमिला यांनी शहरातील ९/११ स्मारकाला भेट देऊन दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, त्यांनी अप्पर मॅनहॅटनमधील मुले आणि कुटुंबांना मदत करणाऱ्या 'हार्लेम ग्रोन' या शहरी शेती नेटवर्कलाही भेट दिली. ममदानी यांनी ९/११ स्मारकाजवळ किंग चार्ल्स यांची भेट घेतली.

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास

१०५.६ कॅरेटचा कोहिनूर हिरा १८४९ मध्ये महाराजा दुलिप सिंह यांनी राणी व्हिक्टोरिया यांना दिला होता. त्यानंतर १९३७ मध्ये राणी मातेने (क्वीन मदर) तो आपल्या मुकुटात परिधान केला होता. भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ते युनायटेड किंगडममधून कोहिनूर भारतात परत आणण्याचे मार्ग शोधत राहतील. भारताने वेळोवेळी ब्रिटन सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित केला असून, यावर "समाधानकारक तोडगा" काढण्यासाठी ते विविध मार्ग आणि माध्यमांचा शोध घेणे सुरू ठेवतील, असे सांगितले आहे.

सध्या हा कोहिनूर हिरा 'टॉवर ऑफ लंडन'मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. हिस्टोरिक रॉयल पॅलेसेस या संस्थेनुसार, या हिऱ्याचे "मुघल सम्राट, इराणचे शाह, अफगाणिस्तानचे अमीर आणि शीख महाराजांसह अनेक पूर्व मालक राहिले आहेत.

भेटीत काय घडले

जोहरान ममदानी हे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहराचे महापौर आहेत. त्यांची आई भारतीय चित्रपट निर्मात्या मीरा नायर असून त्यांची भारताशी नाळ जोडली गेली आहे. ९/११ हल्ल्यांच्या समरणोत्सवासाठी ब्रिटनचे किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला हे सध्या अमेरिकेच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. या समारंभात दोघेही एकमेकांशी संवाद साधत असताना दिसून आले. पंरतु, कोहिनूर हिऱ्याचा प्रश्न उपस्थित केला का, या प्रश्नाचे उत्तर देण्यास बकिंगहॅम पॅलेसने नकार दिला. दरम्यान, ममदानींच्या कार्यालयानेही याबद्दल अद्याप काही उत्तर दिलेले नाही.

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

वरातीमधील डीजेच्या कर्कश आवाजामुळे १४० कोंबड्या मृत्युमुखी; कुक्कुटपालन व्यावसायिकाची पोलिसांकडे तक्रार दाखल

नवी मुंबई APMC त कलिंगड विक्रेते हवालदिल; अफवांमुळे विक्रीत ३० टक्के घट

भय्यांना मराठी शिकवून काय साध्य होणार? राज ठाकरे यांचा सवाल राज्यकर्त्यांवर आणि माध्यमांवरही टीका

हार्बर लाइनवर आजपासून १४ एसी लोकल फेऱ्यांची भर