न्यूयॉर्क येथील लागार्डिया विमानतळावर (LaGuardia Airport) रविवारी रात्री भीषण अपघात झाला. कॅनडामधील मॉन्ट्रियल येथून आलेल्या एयर कॅनडा एक्स्प्रेसच्या विमानाने धावपट्टीवर असलेल्या एयरपोर्टच्या फायर ट्रकला धडक दिली. या घटनेमुळे विमानतळावरील कामकाज विस्कळीत झाले.
धावपट्टीवर ट्रक ओलांडताना घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, एयरपोर्टवरील फायर ट्रक एका युनायटेड एयरलाईन्स (United Airlines) च्या विमानाकडे जाण्यासाठी धावपट्टी ओलांडत होता. त्यावेळी एयर कॅनडा एक्स्प्रेसचे CRJ-900 विमान उतरल्यावर काही क्षणांतच या ट्रकला धडकले.
दरम्यान, युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग 737 मॅक्स विमानाने केबिनमध्ये विचित्र वास जाणवल्याने आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती आणि अग्निशमन दलाची मदत मागवली होती. परंतु, सूचना देऊनही ट्रक थांबला नाही, त्यामुळे दुर्घटना घडली अशी माहिती समोर येत आहे.
उड्डाणे थांबवली, 'ग्राउंड स्टॉप' घोषणा
या घटनेनंतर फेडरल ॲव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने सर्व येणाऱ्या उड्डाणांसाठी 'ग्राउंड स्टॉप' लागू केला. म्हणजेच, सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाकडे येणारी सर्व उड्डाणे उड्डाण घेण्यापूर्वीच थांबवण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत ही बंदी काही तास लागू राहू शकते.
२ जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेकजण जखमी
या अपघातानंतर सर्व प्रवाशांची तात्काळ सुटका करण्यात आली. माध्यमांच्या वृत्तानुसार, ७२ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स असलेल्या या विमानातील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, या घटनेत पायलट आणि को-पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये प्रवाशांना विमानातून बाहेर काढताना आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी धाव घेताना दिसत आहेत. काही दृश्यांमध्ये विमानाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही दिसते.
तपास सुरू होणार
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान आणि फायर ट्रकचे नुकसान किती झाले याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, या अपघातामुळे न्यूयॉर्कमधील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या लागार्डिया विमानतळावर उड्डाणे उशिराने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.