न्यूयॉर्क येथील लागार्डिया विमानतळावर (LaGuardia Airport) रविवारी (दि.२२) रात्री भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एअर कॅनडाच्या विमानातील एअर होस्टेस तब्बल ३३० फूट दूर फेकली गेली, तरीही ती जिवंत बचावल्याची माहिती समोर आली आहे. एअर होस्टेसच्या कुटुंबीयांनी याला 'चमत्कार' म्हटले आहे.
या एअर होस्टेसचे नाव सोलांज ट्रेंब्ले असे असून, अपघाताच्या वेळी ती जंप सीटला बांधलेल्या अवस्थेत होती. अपघातानंतर सोलांज विमानाबाहेर फेकली गेली. या घटनेत तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती समोर आली आहे.
एअर होस्टेसची मुलगी म्हणाली...
सोलांजची मुलगी सारा लेपिनने सांगितले, "आईचा जीव वाचला, हा खरोखरच चमत्कार आहे. जणू कोणीतरी देवदूत तिचं रक्षण करत होता."
पायलट आणि को-पायलटचा मृत्यू
रविवारी रात्री घडलेल्या या अपघातात मॉन्ट्रियलहून आलेले एयर कॅनडा एक्स्प्रेसचे CRJ-900 विमान धावपट्टीवर असलेल्या फायर ट्रकवर आदळले. या दुर्घटनेत दोन्ही पायलट अँटोइन फॉरेस्ट आणि मॅकेंझी गन्टर यांचा मृत्यू झाला असून, इतर काही जण जखमी झाले आहेत.
धडकेआधीची परिस्थिती
प्राथमिक माहितीनुसार, एका दुसऱ्या विमानाने उड्डाण रद्द करताना केबिनमध्ये विचित्र वास येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे फायर ट्रकला धावपट्टी ओलांडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्याचवेळी धावपट्टीवर आलेल्या या ट्रकला येणाऱ्या विमानाने धडक दिली.
एअर ट्रॅफिक कंट्रोलचा ऑडिओ चर्चेत
या घटनेशी संबंधित एअर ट्रॅफिक कंट्रोलचा ऑडिओही समोर आला आहे. धडकेच्या काही क्षणांपूर्वी कंट्रोलर "स्टॉप, स्टॉप, स्टॉप" असे सांगत ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा देताना ऐकू येतो. अपघातानंतर त्याच कंट्रोलरने "मी गडबड केली" (I messed up) असे म्हणत खेद व्यक्त केल्याची माहिती आहे.
प्रवाशांची सुटका, तपास सुरू
माहितीनुसार, या विमानात ७२ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. अपघातानंतर सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, फेडरल एव्हिएशन प्रशासनाने या घटनेला 'दुर्दैवी अपघात' असे संबोधले असून, धडकेमागील नेमके कारण आणि रनवेतील संभाव्य त्रुटींचा तपास सुरू आहे.