लॉस एंजेलिस : जगप्रसिद्ध कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस येथील जंगलाला लागलेली आग हॉलिवूडपर्यंत पोहचली आहे. तीन दिवसांत ४,८५६ हेक्टर क्षेत्राला या आगीची झळ बसली आहे. यात १,९०० इमारती खाक झाल्या असून २८ हजार घरांचे नुकसान झाले. या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला.
लॉस एंजेलिस येथील हॉलिवूड स्टार्सची घरेही आगीत सापडली आहेत. आगीमुळे शेकडो घरे जळून खाक झाली असून रस्त्यावर राख पसरली आहे. या आगीचे रौद्ररूप पाहता लॉस एंजेलिस भागातील सर्व शाळा व कॉलेज बंद करण्यात आले आहेत.
लॉस एंजेलिस भागात १५,८०० एकरहून अधिक भागात आग पसरली आहे. प्रशांत महासागरातील ‘चक्रीवादळा’मुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनले आहे. या आगीमुळे २ कोटी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याने हवेचा दर्जाही खालावला आहे. ही आग पसरण्याचा वेग मिनिटाला ५ फुटबॉल मैदानाला जाळतील या तीव्रतेचा आहे.
स्पीलबर्ग, मूर यांची घरे खाक
या आगीत पॅरिस हिल्टन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मँडी मूर, एश्टन कुचर आदी हॉलिवूड स्टार्सची घरे खाक झाली. यातील पॅरिस हिल्टनचे घर ७२ कोटी रुपयांचे होते. ही आग वेगाने पसरत आहे. जगभरात चित्रपट निर्मितीसाठी हॉलिवूड प्रसिद्ध आहे. कॅलिफोर्नियात ५० हजार जणांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले असून तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. शहरात प्रशासनाने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली आहे. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे घरही रिकामे करण्यास सांगितले आहे.
७,५०० कर्मचारी आग विझवण्यासाठी तैनात
कॅलिफोर्नियात हेलिकॉप्टर व विमानाने आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेगवान हवा व त्याची दिशा बदलत असल्याने ठिकठिकाणी आग लागत आहे. ७,५०० अग्निशमन कर्मचारी आग विझवण्याचे काम करत आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती जो बायडेन यांनी आपला इटलीचा दौरा रद्द केला आहे. कॅलिफोर्नियातील आग विझवण्यासाठी व पुनर्निर्माणासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, असे बायडेन म्हणाले.