दारू पिण्याच्या सवयीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने स्वतःच्या वडिलांची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला आणि त्यानंतर बाहेर जाऊन शांतपणे बिर्याणी खाल्ली. ही घटना छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर शहरात ही घटना सोमवारी (दि. २) रात्री घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रभात केरकेट्टा उर्फ लेडा (२५) याचे वडील पारस केरकेट्टा (५०) हे घरात एकटे राहत होते. तर प्रभात जवळच भाड्याच्या घरात राहत होता.
सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रभात मद्यधुंद अवस्थेत वडिलांच्या घरी आला. त्यावेळी पारस यांनी मुलाच्या दारू पिण्याच्या सवयीवर आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद चिघळताच संतप्त झालेल्या प्रभातने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलून वडिलांच्या डोक्यावर अनेक वेळा वार केले. या हल्ल्यात पारस यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह टाकीत टाकला, नंतर बिर्याणी खाल्ली
हत्या केल्यानंतर प्रभातने वडिलांचा मृतदेह ओढत नेऊन घराजवळील एका छोट्या पाण्याच्या टाकीत टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तो जवळच्या दुकानात गेला, बिर्याणी मागवून शांतपणे जेवला आणि पुन्हा घरी जाऊन झोपला.
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती
सोमवारी रात्री झालेला वाद शेजाऱ्यांनी ऐकला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पारस घराबाहेर दिसत नसल्याने संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता घराजवळील पाण्याच्या टाकीत पारस केरकेट्टा यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले.
वारंवार होत होते वाद
स्थानिक रहिवासी राकेश प्रधान यांनी सांगितले की, प्रभातला दारूचे व्यसन होते आणि यावरून वडील-मुलामध्ये वारंवार वाद होत असत. “सोमवारी रात्रीही त्यांच्यात मोठा वाद झाला होता,” असे त्यांनी सांगितले.
आरोपी अटकेत, तपास सुरू
ही घटना मणिपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून ठाणे प्रभारी अधिकारी सी. पी. तिवारी यांनी सांगितले की, आरोपीने धारदार शस्त्राने वडिलांवर हल्ला करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, चौकशीदरम्यान प्रभात केरकेट्टा उर्फ लेडा याने रागाच्या भरात ही हत्या "चुकून" झाल्याचा दावा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.