हिंडेनबर्गच्या अहवालानंतर संकटात अडकलेल्या अदानी समूहाला मॉरिशस सरकारने दिलासा दिला आहे. “अदानी समूहावर फसवणुकीचा आरोप लावणाऱ्या हिंडेनबर्गचा अहवाल खोटा आणि तथ्यहीन आहे, असे मॉरिशसच्या वित्तीय सेवा मंत्र्यांनी संसदेत सांगितले.
हिंडेनबर्गच्या अहवालामध्ये लावण्यात आलेल्या आरोपासंदर्भात मॉरिशसच्या एका संसद सदस्याने सरकारला प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरादाखल वित्तीय सेवा मंत्री महेन कुमार सीरुत्तन यांनी सांगितले की, “मॉरिशसचा कायदा खोट्या कंपन्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देत नाही. वित्तीय सेवा आयोगाकडून (एफएससी) परवाना घेणाऱ्या सर्व ग्लोबल कंपन्यांना नियमांचे पालन करावे लागेल. कारण आयोगाची त्यांच्यावर करडी नजर असते. अदानी समुहाने आतापर्यंत कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नाही. एफएससीने हिंडेनबर्ग रिपोर्टची छाननी केली आहे. मात्र कायदेशीर गोपनीयतेशी निगडित त्यांच्या विवरणाचा खुलासा करता येणार नाही.”
यापूर्वी एफएससीचे सीईओ धनेश्वरनाथ ठाकूर यांनी मॉरिशसमध्ये अदानी समुहाशी निगडित सर्व कंपन्यांच्या मूल्यांकनासंदर्भात कोणत्याही त्रूटी आढळल्या नसल्याचे स्पष्ट केले होते.
अमेरिकेची खासगी संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारीला जारी करण्यात केलेल्या अहवालात अदानी समूहावर मोठे आरोप केले होते. अब्जधीश गौतम अदानी यांनी आपल्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात हेराफेरी करण्यासाठी मॉरिशसमध्ये बनवण्यात आलेल्या खोट्या कंपन्यांचा वापर केला आहे. या आरोपांचे अदानी समुहानेही खंडन केले आहे. आता मॉरिशस सरकारनेही हा अहवाल खोटा आणि तथ्यहिन असल्याचे म्हटले आहे.