आंतरराष्ट्रीय

फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; स्वित्झर्लंडमध्ये पळून जाण्याचा करत होता प्रयत्न, भारतात प्रत्यार्पण होणार?

पंजाब नॅशनल बँकेतील ₹१३,५७८ कोटींच्या घोटाळ्यात भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला तब्बल ७ वर्षांनी अखेर अटक झाली आहे. भारतीय तपास संस्थांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियममधील पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या. सीबीआय आणि ईडी यांसारख्या भारतीय एजन्सी त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होत्या आणि तो ज्या देशांत होता तिथे त्याचा मागोवा घेत होत्या.

Krantee V. Kale

पंजाब नॅशनल बँकेतील ₹१३,५७८ कोटींच्या घोटाळ्यात भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला तब्बल ७ वर्षांनी अखेर अटक झाली आहे. भारतीय तपास संस्थांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियममधील पोलिसांनी त्याला शनिवारी (दि.१२) बेड्या घातल्या. तथापि, बेल्जियमकडून सोमवारी ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.

भारताने अनेकदा केले प्रत्यार्पणासाठी प्रयत्न

पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी हा मुख्य आरोपी आहे. त्याने भाचा नीरव मोदीच्या साथीने हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवले आणि नंतर तपास यंत्रणांकडून चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी परदेशात पळ काढला. चोक्सी २०१८ च्या सुरुवातीला, पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच भारतातून पळून गेला. त्याने अँटिग्वा आणि बारबुडा येथे आश्रय घेतला होता. येथे त्याने गुंतवणूक कार्यक्रमाद्वारे नागरिकत्व मिळवले होते. भारताने वारंवार प्रत्यार्पणाचे प्रयत्न केले, मात्र कायदेशीर अडथळ्यांमुळे त्याला परत आणणे शक्य होत नव्हते. नंतर, २०२१ मध्ये त्याला डोमिनिकन रिपब्लिकमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारने त्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयची टीम तात्काळ पाठवली. मात्र, चोक्सीच्या वकिलांनी त्याला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज आहे आणि त्याला अँटिग्वाला परत जाऊ द्यावे, असा न्यायालयात युक्तिवाद केला. डोमिनिकन तुरुंगात ५१ दिवस घालवल्यानंतर, क्वीन प्रिव्ही कौन्सिलने त्याला दिलासा दिला आणि देश सोडण्याची परवानगी दिली, त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांचे प्रत्यार्पणाचे प्रयत्न पुन्हा थांबले.

सीबीआय, ईडीचे हालचालींवर सतत लक्ष

नंतर बेकायदेशीर प्रवेशाच्या आरोपातून चोक्सीची मुक्तता करण्यात आली. तथापि, या संपूर्ण काळात, सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांसारख्या भारतीय एजन्सी त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होत्या आणि तो ज्या देशांत होता तिथे त्याचा मागोवा घेत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय एजन्सींना गेल्या वर्षीच चोक्सी बेल्जियममध्ये असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्यांनी त्याच्याशी संबंधित प्रकरणाशी फाईली बेल्जियमच्या अधिकाऱ्यांसोबतही शेअर केल्या होत्या. त्यानंतर अखेर १२ एप्रिल, शनिवारी बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावेळी तो कर्करोगाच्या उपचाराचा बहाणा करुन स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, असे समजते.

भारतात प्रत्यार्पण होणार?

चोक्सीची पत्नी प्रीती हिच्याकडे बेल्जियन नागरिकत्व आहे. रिपोर्ट्सनुसार, चोक्सीने बनावट कागदपत्रांचा वापर करून बेल्जियममधील रहिवासी ओळखपत्र मिळवले होते. त्याने स्वतःची भारतीय आणि अँटिग्वाची ओळख देखील लपवली होती. अलीकडेच चोक्सीच्या वकिलांनी ब्लड कॅन्सरचे उपचार सुरू असल्याने चोक्सी भारतामध्ये परतू शकत नाही, असे सांगितले होते. दरम्यान, बेल्जियममध्ये अटकेनंतर चोक्सीला कोठडीत ठेवण्यात आले असून त्याच्या वकिलांशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे, त्याच्या प्रत्यार्पणासाठी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वय देखील सुरू आहे. मात्र त्याचे वकील वैद्यकीय कारण देत प्रत्यार्पणासाठी आडकाठी करू शकतात.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश