Microsoft Global Outage : जगभरातील युजर्सना मोठा दिलासा! मायक्रोसॉफ्टच्या सर्व सेवा सुरू, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
आंतरराष्ट्रीय

Microsoft Global Outage : जगभरातील युजर्सना मोठा दिलासा! मायक्रोसॉफ्टच्या सर्व सेवा सुरू, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

नेटवर्कची क्षमता वाढवण्याचे काम सुरू असताना या तांत्रिक समस्येची सुरुवात झाली. त्यानंतर नेटवर्कमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे हा बिघाड समोर आला.

किशोरी घायवट-उबाळे

जगभरातील मायक्रोसॉफ्ट युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. नेटवर्कची क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मायक्रोसॉफ्टच्या सेवा विस्कळीत झाल्या होत्या. या समस्येचा जगभरातील ७२ ते ७४ देशांमधील युजर्सना फटका बसला होता. भारतातील इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा एअर या विमान कंपन्यांच्या ग्राहक सहाय्य सेवांवरही याचा परिणाम झाला. अखेर शनिवारी (दि. १४) मायक्रोसॉफ्टने आपल्या सर्व सेवा पूर्ववत केल्याची माहिती दिली. तसेच या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफी मागितली आहे

जगभरातील युजर्सना फटका

माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२) रात्री उशिरा मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आधारित सेवांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे जगभरातील युजर्सना आउटलुक ई-मेल आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ मधील काही सेवांचा वापर करताना अडचणी येऊ लागल्या. विशेषतः ई-मेल पाठवणे, प्राप्त करणे आणि आउटलुक अकाऊंट्समध्ये प्रवेश करणे यामध्ये अडथळे निर्माण झाले.

या समस्येचा परिणाम व्यावसायिक आणि मोठ्या संस्थांसाठीच्या सेवांसह सर्वसामान्य ग्राहक वापरत असलेल्या उत्पादनांवरही झाला. जगभरातील ७२ ते ७४ देशांमध्ये मायक्रोसॉफ्टच्या सेवांमध्ये अडथळे आल्याची नोंद करण्यात आली होती. डाऊनडिटेक्टर या प्लॅटफॉर्मवर आउटलुकशी संबंधित समस्यांच्या १ लाख ३० हजारांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.

नेटवर्क अपग्रेडमधील बिघाडामुळे सेवा ठप्प

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, नेटवर्कची क्षमता वाढवण्याचे काम सुरू असताना या तांत्रिक समस्येची सुरुवात झाली. त्यानंतर नेटवर्कमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे हा बिघाड अधिक स्पष्टपणे समोर आला.

कंपनीने या घटनेचा सायबर हल्ला, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय एजंट्सशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही समस्या पूर्णपणे तांत्रिक स्वरूपाची होती. बिघाडामागील मूळ कारण शोधून ते दूर करण्यात आले. मात्र, एकाच वेळी सर्व सेवा सुरू केल्यास पुन्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने कंपनीने टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक टप्प्यावर यंत्रणेची स्थिरता तपासण्यात आली. त्यामुळे सेवा पुन्हा सुरू होण्यास काहीसा अधिक वेळ लागला.

कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

शनिवारी (दि. १४) सकाळी मायक्रोसॉफ्टच्या सेवेबद्दल माहिती देणाऱ्या अधिकृत पेजवर सर्व उत्पादने कार्यरत असल्याचा मेसेज झळकला. यामध्ये मायक्रोसॉफ्ट ३६५ च्या व्यावसायिक आणि मोठ्या संस्थांसाठीच्या सेवा तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध उत्पादनांचा समावेश होता.

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने एक्सवरील पोस्टद्वारे ग्राहकांची माफी मागितली. या घटनेमुळे ग्राहक आणि भागीदारांना झालेल्या गैरसोयीची कंपनीला जाणीव असून त्यांच्या विश्वासाला कंपनी महत्त्व देते, असे निवेदनात म्हटले आहे.

मायक्रोसॉफ्टचे कोपायलट, एजंट्स आणि प्लॅटफॉर्म विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष चार्ल्स लामाना यांनीही या घटनेबाबत माहिती दिली. तपासादरम्यान अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये एका यंत्रणेतील बिघाडामुळे इतर यंत्रणांवर परिणाम होणे आणि नेटवर्कच्या बाह्य सीमांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विनंत्या येणे, म्हणजेच 'थंडरिंग हर्ड्स' या समस्येचा समावेश होता.

या संपूर्ण घटनेचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी अभियांत्रिकी पथक काम करत असून लवकरच सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असे लामाना यांनी स्पष्ट केले. या अहवालात बिघाडाचा घटनाक्रम आणि भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे.

भारतातील विमान कंपन्यांनाही फटका

मायक्रोसॉफ्टच्या सेवांमधील बिघाडाचा परिणाम भारतातील विविध क्षेत्रांवरही झाला. इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा एअर या विमान कंपन्यांनी ई-मेलवर आधारित ग्राहक सहाय्य सेवांमध्ये अडथळे निर्माण झाल्याची माहिती दिली.

त्यामुळे प्रवाशांकडून येणारे ई-मेल प्राप्त करणे आणि त्यांना उत्तर देणे या प्रक्रियांमध्ये अडचणी येत होत्या. ग्राहकांचे मेसेज कंपनीपर्यंत पोहोचत राहावेत, यासाठी एअर इंडियाने तात्पुरत्या स्वरूपात ई-मेल सेवा पर्यायी मार्गावर वळवल्या. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे विमानांच्या प्रत्यक्ष उड्डाणांवर परिणाम झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आले नव्हते. दुसरीकडे, वित्तीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांनाही संशोधन अहवाल मिळवणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे यामध्ये अडचणींचा सामना करावा लागला.

आउटलुक सेवांवर सर्वाधिक परिणाम

या संपूर्ण तांत्रिक बिघाडाचा सर्वाधिक परिणाम मायक्रोसॉफ्ट ३६५ मधील एक्स्चेंज ऑनलाइन या क्लाउड आधारित ई-मेल प्लॅटफॉर्मवर झाला. युजर्सना वेबवरील आउटलुक तसेच संगणकावरील आउटलुक ॲप्लिकेशनमधून ई-मेल खात्यांमध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत होत्या. काही ई-मेल पाठवण्यास आणि प्राप्त होण्यासही विलंब झाला.

डाऊनडिटेक्टरवर आउटलुकशी संबंधित समस्यांच्या १ लाख ३० हजारांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. या आकडेवारीवरून या बिघाडाचा मोठ्या प्रमाणावर युजर्सना फटका बसल्याचे स्पष्ट झाले.

सर्व सेवा सुरू, तरीही यंत्रणेवर देखरेख

शनिवारी सर्व सेवा पूर्ववत झाल्याचे जाहीर केल्यानंतरही मायक्रोसॉफ्टने आपल्या यंत्रणेवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली. सेवा खंडित असताना मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिलेल्या ई-मेलवरही कंपनी लक्ष ठेवून होती. हे ई-मेल व्यवस्थित पाठवले आणि प्राप्त झाले आहेत की नाही, याची खात्री करण्यावर भर देण्यात आला.

दरम्यान, या घटनेचे संपूर्ण तांत्रिक विश्लेषण करून भविष्यात अशा प्रकारचा बिघाड पुन्हा होऊ नये, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे कंपनीने आश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्या सर्व सेवा पूर्ववत झाल्या असल्या तरी मायक्रोसॉफ्टच्या पुढील तांत्रिक उपाययोजनांकडे युजर्सचे लक्ष लागले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू

सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी घसरले; तोळ्यामागे २५०० रुपयांची घट

US Flight Chaos : अमेरिकेची विमानसेवा ठप्प; लाखो प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?

Jalgaon Earthquake : जळगावमध्ये भूकंपाचा धक्का! रावेर, भुसावळसह अनेक तालुके हादरले; हतनूर धरण परिसरातही हादरा

Thane : छटपूजेसाठी शहरात भव्य कृत्रिम तलावाची निर्मिती; गर्दी नियंत्रणासाठी यंदा प्रथमच टोकन व्यवस्था