आंतरराष्ट्रीय

Myanmar earthquake : म्यानमारमध्ये १६४४ बळी; ४३०० जखमी, शनिवारी पुन्हा भूकंपाचा धक्का

म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपातील बळींचा आकडा १६४४ झाला असून ४३०० जण जखमी झाले आहेत. मात्र, बळींचा आकडा दहा हजारांपेक्षा अधिक असू शकतो.

Swapnil S

यांगून : म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपातील बळींचा आकडा १६४४ झाला असून ४३०० जण जखमी झाले आहेत. मात्र, बळींचा आकडा दहा हजारांपेक्षा अधिक असू शकतो. कारण अनेक नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. म्यानमारमधील अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा पाहता बचाव व मदतकार्य संथगतीने सुरू आहे. म्यानमारमध्ये भूकंपाची मालिकाच सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत म्यानमारमध्ये ५ रिश्टर स्केल क्षमतेचे तीन भूकंप झाले आहेत. शनिवारी दुपारी ३.३० वाजता म्यानमारला पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप ५.१ रिश्टर स्केल क्षमतेचा होता.

म्यानमारमधील लष्करी सरकारने सांगितले की, मृतांचा आकडा १६४४ झाला असून ४३०० हूनअधिक जण जखमी झाले. म्यानमारमधील मंडालेतील विझडम व्हिला प्रायव्हेट हायस्कूलची इमारत कोसळली. यात अनेक विद्यार्थी दबले गेले आहेत.

बँकॉकमध्ये २ हजारांहून इमारतींचे नुकसान

बँकॉक शहराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील २ हजार इमारतींचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी १०० हून अधिक इंजिनिअर तैनात केले आहेत.

थायलंडमध्ये रस्त्यावरच बाळाचा जन्म

थायलंडच्या बँकॉक शहरात डॉक्टरांनी हॉस्पिटलबाहेर रस्त्यावरच महिलेची प्रसूती केली. ही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली. त्याचवेळी भूकंप झाला. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णालय रिकामे करावे लागले. महिला स्ट्रेचरवर झोपली असून रुग्णालयाचे कर्मचारी तिची प्रसूती करत आहेत, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. म्यानमारला काँक्रीट कटर, तंबू, झोपण्याच्या बॅगा, ब्लँकेट, तयार जेवणाचे साहित्य, पाणी शुद्धीकरण मशीन, सोलर दिवे, जनरेटर सेट व आवश्यक औषधे श्वान पथक हवाई दलाच्या ‘सी १ १३० जे’ लष्करी विमानातून पाठवण्यात आले आहे. हे साहित्य यांगूनचे मुख्यमंत्री यू सो थेन यांच्याकडे भारताचे राजदूत अभय ठाकूर यांनी सुपूर्द केले. या भूकंपात कोणत्याही भारतीय नागरिक मृत झाल्याचे वृत्त नाही, असे परराष्ट्र खात्याने सांगितले. संकटाच्या काळात सर्वात पहिल्यांदा मदत करणे हे भारतीय परराष्ट्र धोरणाचा भाग आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

मोदींचे म्यानमारला आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या जनता सरकारचे प्रमुख जनरल मिन आंग हुइंग यांच्याशी चर्चा केली. अत्यंत कठीण प्रसंगात भारत म्यानमारच्या जनतेसोबत उभा आहे, असे आश्वासन मोदी यांनी दिले.

संयुक्त राष्ट्रांकडून ४३ कोटींची मदत

संयुक्त राष्ट्रांनी मदतीसाठी ४३ कोटी रुपये दिले आहे, तर रशियाच्या आपत्कालीन खात्याने १२० बचाव कर्मचारी व मदतीचे सामान दोन विमानांनी पाठवले. चीननेही मदत व बचाव पथक पाठवले असून हाँगकाँग, सिंगापूर, मलेशियाही मदत पाठवणार आहे.

भारताचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’

भारताने ‘ऑपरेशन ब्रह्मा’अंतर्गत म्यानमारमध्ये मदत पाठवली आहे. १५ टन मदत सामग्री व एनडीआरएफचे ८० जवान पाठवले आहेत. तसेच आग्रा येथून ११८ सदस्यांचे आरोग्य पथक म्यानमारला पाठवले जाईल. तसेच भारतीय नौदलाची दोन जहाजे म्यानमारला पाठवली असून मदत सामग्री घेऊन आणखी दोन जहाजे पाठवणार आहोत, असे परराष्ट्र खात्याने सांगितले.

२०० वर्षांतील हा मोठा भूकंप

भूगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा थायलंडमधील २०० वर्षांतील मोठा भूकंप आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, केंद्रापासून शेकडो किमी दूर असलेल्या बँकॉकमधील इमारती नष्ट झाल्या आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत