तेल अवीव : भारतीय जनतेच्यावतीने मी ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘हमास’च्या भयानक दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो. प्रत्येक कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. आम्ही तुमचे दुःख समजतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हमास’चे नाव घेत दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला. मोदी स्पष्ट केले की, निष्पाप नागरिकांची हत्या सहन केली जाणार नाही. दहशतवादाला शून्य सहनशीलता असली पाहिजे. जगाने त्याविरुद्ध एकजुटीने भूमिका घेतली पाहिजे. याबाबत भारत पूर्ण आत्मविश्वासाने इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे,’
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केलेला गाझा शांतता उपक्रम हा एक चांगला मार्ग आहे. भारताने यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रदेशातील सर्व लोकांसाठी, पॅलेस्टिनी समस्येच्या निराकरणासह, न्याय्य आणि चिरस्थायी शांततेचे प्रयत्न सुरू आहेत. शांतीचा मार्ग नेहमीच सोपा नसतो, परंतु या प्रदेशात संवाद, शांती आणि स्थिरतेसाठी भारत तुमच्या आणि जगासोबत उभा आहे.
इस्रायली संसदेत “मोदी, मोदी” घोषणाबाजी
तत्पूर्वी, संसदेत “मोदी, मोदी” च्या घोषणा देण्यात आल्या. ‘नेसेट’चे सभापती अमीर ओहाना यांनी हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असे म्हणत पंतप्रधानांचे नमस्ते म्हणत स्वागत केले. ओहाना म्हणाले की, ‘भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. भारत आणि इस्रायल हे खरे मित्र आहेत. भारताने यहुद्यांना घर दिले. मुंबई दहशतवादी हल्ला असो किंवा पहलगाम, इस्रायल तुमच्यासोबत आहे.’
इस्रायलमध्ये भारतीय ‘यूपीआय’ लागू होणार
पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यात भारताची ‘यूपीआय’ पेमेंट सिस्टीम आता इस्रायलमध्ये लागू केली जाईल, असा निर्णय मोदी आणि इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत घेण्यात आला.
भारत - इस्रायल दरम्यान लवकरच मुक्त व्यापार करार
पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी सांगितले की, भारत लवकरच इस्रायलसोबत मुक्त व्यापार करार करणार आहे. इस्रायलला भेट देणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरूवारी सकाळी, पंतप्रधान मोदींनी प्रथम जेरुसलेममधील होलोकॉस्ट स्मारक याद वाशेमला भेट दिली, जिथे त्यांनी हिटलरच्या नाझी राजवटीत मारल्या गेलेल्या साठ लाख ज्यूंना श्रद्धांजली वाहिली. याद वाशेम हे होलोकॉस्ट दरम्यान मारल्या गेलेल्या लाखो ज्यूंच्या स्मरणार्थ बनवले आहे. हे स्मारक इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये आहे आणि दरवर्षी जगभरातील लोक येथे येऊन इतिहासाची माहिती घेतात आणि श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर मोदींनी इस्रायली राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. आयझॅक यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढली आहे आणि जगाचे लक्ष वेधून घेत आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायली राष्ट्राध्यक्षांना भारत भेटीचे आमंत्रणही दिले.
दोन्ही देशांदरम्यान १७ विविध करार
मोदी आणि नेतान्याहू यांच्या उपस्थितीत १७ विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये कृषी, एआय, शैक्षणिक, उत्पादन, सांस्कृतिक, गुंतवणूक क्षेत्रांचा समावेश आहे.
इस्रायली मंत्री गिला गॅमिएल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खूप चांगले संबंध आहेत आणि दोन्ही देश त्यांचे संबंध आणखी मजबूत करू इच्छितात. इस्रायल आणि भारत यांच्यातील करारांमुळे शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, संरक्षण आणि इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढेल. त्यांनी सांगितले की दोन्ही देश चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात सामायिक करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. त्यांनी दोन्ही देशांच्या लोकांमधील आणि दोन्ही पंतप्रधानांमधील खोल संबंधांबद्दल देखील सांगितले.