नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती! मृतांचा आकडा ५४७ वर; ३२० भारतीय बेपत्ता; ४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले 
आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये पुन्हा महापुराची भीती! मृतांचा आकडा ५४७ वर; ३२० भारतीय बेपत्ता; ४०० जण तिबेटच्या सीमेवर अडकले

Nepal Floods : मध्य नेपाळमध्ये आलेल्या प्रलयकारी पुरामुळे (फ्लॅश फ्लड) निर्माण झालेली परिस्थिती शुक्रवारी अधिकच बिकट झाली. या पुराच्या तडाख्यातील मृतांची संख्या वाढून तब्बल ५४७ वर पोहोचली आहे. शोध आणि बचाव मोहीम सुरू असतानाच अधिक मृतदेह हाती येत आहेत.

Swapnil S

काठमांडू : मध्य नेपाळमध्ये आलेल्या प्रलयकारी पुरामुळे (फ्लॅश फ्लड) निर्माण झालेली परिस्थिती शुक्रवारी अधिकच बिकट झाली. या पुराच्या तडाख्यातील मृतांची संख्या वाढून तब्बल ५४७ वर पोहोचली आहे. शोध आणि बचाव मोहीम सुरू असतानाच अधिक मृतदेह हाती येत आहेत.

भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाल्याने नव्याने पुराचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाकडून अत्यंत खबरदारीने बचावकार्य राबवले जात आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण महापुरामळे आणि ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून या दुर्घटनेत किमान ३२० भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत तर चीनच्या (तिबेट) हद्दीत सुमारे ४०० भारतीय अडकले आहेत.

तिबेटच्या हद्दीत अडकलेल्यांपैकी ९६ भारतीय नागरिक रस्तेमार्गाने सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. पूरग्रस्त भागातून काठमांडू येथे पोहोचलेल्या तामिळनाडूच्या २१ भारतीयांचे शुक्रवारी दुपारी नवी दिल्ली विमानतळावर आगमन झाले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेतली. बेपत्ता असलेल्या ३२० भारतीयांशिवाय, कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले इतर देशांचे नागरिकत्व असलेले सुमारे १०० भारतीय वंशाचे नागरिकही सध्या संपर्काबाहेर आहेत. चीनच्या हद्दीत अडकलेले ४०० भारतीय सुरक्षित असून ते त्यांच्या कुटुंबांच्या संपर्कात आहेत. बीजिंगमधील भारतीय दूतावास तेथील स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमधील मदत आणि बचावकार्याचा आढावा घेण्यात आला आहे. अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले.

५४७ मृतदेह मिळाले

नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी देशातील आठ वेगवेगळ्या जिल्ह्यांतून ५४७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत.चीनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिबेट स्वायत्त प्रदेशातील जिरॉन्ग परगण्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पर्यटन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारपर्यंत ८५ भारतीयांसह १२१ परदेशी पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

चीनकडून अलर्ट

नेपाळच्या तिबेट सीमेवर 'छोछेन खोला' आणि 'पुरेपु त्सांगपो' नद्यांच्या संगमाजवळ पाण्याचा मोठा कृत्रिम तलाव (बॅरियर लेक) तयार झाल्याचे सांगत चीनने गुरुवारी उशिरा लेव्हल-४ अलर्ट जारी केला आहे. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागानेही भोटेकोशी नदीच्या खालील भागांत पुराचा धोका असल्याचा इशारा दिला आहे.

चिनी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या तलावात सध्या सुमारे २० लाख घनमीटर पाणी साचले असून पुढील तीन दिवसांत आणखी ३० लाख घनमीटर पाणी त्यात साचण्याची शक्यता आहे. हा तलाव फुटल्यास भीषण आपत्ती ओढवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

शवागारांमध्ये जागेची टंचाई

पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मृतदेह खूप लांबवर वाहून गेले आहेत. रसुवा आणि नुवाकोटमधून वाहून आलेले मृतदेह चितवन, तनहू, नवलपरासी आणि गोरखा या जिल्ह्यांत सापडत आहेत. अनेक ठिकाणच्या रुग्णालयांमधील शवागारे भरून गेली असून तेथे जागेची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ८४ जखमींवर काठमांडूतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, जेथे नातेवाईक आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत.

सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन

राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी भीषण पूर आला होता, त्याच भागात चिखलमिश्रित पाण्याची पातळी पुन्हा वाढली असून आणखी एका महापुराचा धोका निर्माण झाला आहे. भोटेकोशी आणि त्रिशुली नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच बचावकार्यात कार्यरत असलेल्या पथकांना सतर्क राहण्याचे आणि धोका आढळल्यास तातडीने सुरक्षित स्थळी हलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

माणसांसाठी सण की सणांसाठी माणूस?

आजचे राशिभविष्य, २९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रबरबँडला विसरा! केस बांधताना स्क्रंची का ठरते फायदेशीर? जाणून घ्या

Nepal Floods : पुरात वाहून आलेल्या मृतदेहालाही सोडलं नाही! दागिन्यांवर डल्ला, VIDEO व्हायरल होताच दोघांना बेड्या

घोटगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी! कुडाळ-कोल्हापूर अंतर कमी होणार; १३ किलोमीटरच्या मार्गासाठी १३ कोटींचा निधी