आंतरराष्ट्रीय

तीन अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर; नावीन्यतेमुळे आर्थिक विकासात भर

जोएल मोकिर (अमेरिकन), फिलिप अघिओं (ब्रिटिश) आणि पीटर हॉवीट (अमेरिकन) या तीन अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यांनी नवकल्पना आर्थिक वाढ कशी घडवतात आणि नवी तंत्रज्ञाने जुनी परिमाणे कशी बदलतात, या विषयावर केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे.

Swapnil S

स्टॉकहोम : जोएल मोकिर (अमेरिकन), फिलिप अघिओं (ब्रिटिश) आणि पीटर हॉवीट (अमेरिकन) या तीन अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यांनी नवकल्पना आर्थिक वाढ कशी घडवतात आणि नवी तंत्रज्ञाने जुनी परिमाणे कशी बदलतात, या विषयावर केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे. या प्रक्रियेला अर्थशास्त्रात “सर्जनशील विनाश” असे म्हटले जाते.

या तीनही विजेत्यांनी अर्थशास्त्राकडे भिन्न पण पूरक दृष्टिकोनातून पाहिले. मोकिर हे आर्थिक इतिहासकार असून त्यांनी ऐतिहासिक पुरावे वापरून दीर्घकालीन प्रवाहांचा अभ्यास केला, तर अघिओं आणि हॉवीट यांनी गणिताच्या आधारे सर्जनशील विनाशाच्या प्रक्रियेचे विश्लेषण केले.

डच-जनक मोकिर (७९) हे नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात कार्यरत आहेत. अघिओं (६९) हे कॉलेज द फ्रान्स आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सशी संलग्न आहेत; तर जन्माने कॅनेडियन असलेले हॉवीट (७९) ब्राऊन विद्यापीठाशी संबंधित आहेत.

पत्रकाराने सकाळी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मोकिर म्हणाले, ‘लोक नेहमी म्हणतात की त्यांना आश्चर्य वाटले, पण माझ्या बाबतीत हे खरे आहे. मला अजिबात कल्पना नव्हती की असे काही होणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी मला विचारले की, तुम्हाला नोबेल मिळू शकतो का? मी त्यांना सांगितले की, माझ्या नोबेल मिळण्याची शक्यता पोप बनण्याइतकीच आहे. मी यहुदी आहे, हेही सांगा.’ मी अजून निवृत्त होण्याचा विचार करत नाही. हेच ते काम आहे ज्याचे स्वप्न मी आयुष्यभर पाहिले, असे ते म्हणाले.

अघिओं म्हणाले, “मला शब्दच सापडत नाहीत या सन्मानाबद्दल काय बोलावे. त्यांनी सांगितले की, ते बक्षिसाच्या रकमेतून आपल्या संशोधन प्रयोगशाळेत गुंतवणूक करणार आहेत. व्यापारयुद्धे आणि संरक्षणवादाबद्दल विचारले असता अघिओं म्हणाले, ‘अमेरिकेतील संरक्षणवादी धोरणे मला मान्य नाहीत. ती जगातील आर्थिक वाढ आणि नवकल्पनांसाठी चांगली नाहीत.’

नोबेल समितीचे अध्यक्ष जॉन हॅसलर म्हणाले, ‘अर्थव्यवस्थेतील वाढ ही आपोआप होत नाही. सर्जनशील विनाशाला चालना देणाऱ्या यंत्रणांना आपण जपले पाहिजे, अन्यथा अर्थव्यवस्था स्थिरावेल.’

१.१ कोटी स्वीडिश क्रोनर इतक्या पारितोषिकाची अर्धी रक्कम मोकिर यांना मिळेल, तर उर्वरित अर्धी अघिओं आणि हॉवीट यांच्यात विभागली जाईल. विजेत्यांना १८ कॅरेट सोन्याचे पदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

सर्जनशील विनाश संकल्पनेचा गौरव

विजेत्यांना “सर्जनशील विनाश” या अर्थशास्त्रीय संकल्पनेचे अधिक स्पष्ट आणि परिमाणात्मक स्पष्टीकरण दिल्याबद्दल गौरविण्यात आले आहे. अघिओं आणि हॉवीट यांनी १९९२ मधील त्यांच्या प्रसिद्ध संशोधनात सर्जनशील विनाशावर आधारित आर्थिक वाढीचा गणिती नमुना मांडला होता. नोबेल समितीने म्हटले की, ‘जर नवकल्पना एकामागून एक यशस्वी व्हायच्या असतील, तर केवळ त्या कार्य करतात हे जाणून चालत नाही. त्या का कार्य करतात याचे वैज्ञानिक स्पष्टीकरणही आवश्यक आहे.’

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास