
हरियाणातील चंदीगडमध्ये IPS अधिकारी वाय. पुरन कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणाला आता एक गंभीर आणि गूढ वळण लागले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) संदीप कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोट आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी पुरन कुमार यांच्यावरच गंभीर आरोप लावले आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा आणि प्रशासन हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, IPS वाय. पुरन कुमार यांनी ७ ऑक्टोबर रोजी चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केली. घटनास्थळी ३ पानांची सुसाईड नोट, मृत्यूपत्र सदृश दस्तऐवज आणि काही इलेक्ट्रॉनिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. या घटनेनंतर चंदीगड पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र, तपासाची सूत्रे हाताळणारे ASI संदीप कुमार यांनी आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह रोहतक-पानिपत रस्त्यावरील एका ट्यूबवेलजवळ आढळला. घटनास्थळावर त्यांची ६ पानी सुसाईड नोट आणि एक व्हिडिओ संदेश सापडला असून, त्यात त्यांनी पुरन कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचार, जातीवाद आणि प्रशासनातील षडयंत्राचे गंभीर आरोप केले आहेत.
पुरन कुमार भ्रष्ट अधिकारी
संदीप कुमार यांनी पुरन कुमार यांच्यावर आरोप केले, की ज्या दिवशी IG पूरन कुमार यांची पोस्टिंग झाली, त्या दिवशी त्यांनी कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याची जात पाहिली आणि त्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या भ्रष्ट लोकांना नियुक्त करण्यास सुरुवात केली. त्या लोकांना माहित होते, की कोणत्या फाईल्समध्ये त्रुटी आहेत, म्हणून त्यांनी लोकांना बोलावले आणि पैसे मागायला सुरुवात केली. मी जे म्हणतोय ते खरे आहे. तुम्ही लोक न्यायाच्या खुर्चीवर बसला आहात, तुम्ही पैसे कसे मागू शकता?
...म्हणून पुरन कुमार यांनी आत्महत्या केली
पुढे पुरन कुमार यांच्या पत्नीवर आरोप करत म्हटले, त्याची पत्नी आयएएस अधिकारी आहे, त्याचा मेहुणा आमदार आहे. त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या भीतीने त्याने आत्महत्या केली. त्याचा अहंकार खूप तीव्र होता. जेव्हा त्याला कळले की त्याचे पाप ओसंडून वाहत आहे, जेव्हा त्याला कळले की त्याची बदनामी होईल आणि त्याच्या कुटुंबाची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आत्महत्या केली. डीजीपी हे खूप प्रामाणिक माणूस आहेत, आयएएस लॉबी त्यांना काढून टाकू इच्छिते.
या दुहेरी आत्महत्यांनंतर हरियाणा सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, "कोणताही अधिकारी कितीही प्रभावशाली असला तरी दोषी आढळल्यास त्याला अटक केली जाईल."
वाय. पुरण कुमार यांच्या आत्महत्येच्या तपासात एएसआय संदीप कुमार यांच्या मृत्यूने संपूर्ण प्रकरणच नव्या वळणावर आले आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध एका तपास अधिकाऱ्यानेच केलेले आरोप हे गंभीर आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष या तपासाच्या निष्कर्षाकडे लागले आहे.