आंतरराष्ट्रीय

इराणच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान खवळला, घेतला मोठा निर्णय; दोन्ही देशांमधील तणाव वाढला

बलुचिस्तानमध्ये इराणने हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

बलुचिस्तानमध्ये इराणने हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले आहे. तसेच, इराणचे पाकिस्तानातील राजदूत जे सध्या इराणमध्येच आहेत त्यांना तुम्हाला पाकिस्तानात परतण्याची गरज नाही, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याशिवाय, पाकिस्तानने इराणचे सर्व उच्चस्तरीय दौरेही स्थगित केले आहेत.

मंगळवारी इराणने बलुचिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर, या हल्ल्यामध्ये दोन मुले ठार आणि तीन जखमी झाल्याचा दावा करत पाकिस्तानने तीव्र निषेध नोंदवला होता. आपल्या हद्दीत केलेला हल्ला “बेकायदेशीर आणि अस्वीकार्य पाऊल” असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, पाकिस्तानला प्रत्युत्तराची कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि याची जबाबदारी इराणची असेल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

चीनने केले संयम बाळगण्याचे आवाहन

तणाव वाढल्यामुळे पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांशी चांगले संबंध असलेल्या चीनने दोन्ही देशांना संयम बाळगण्याची विनंती केली आहे. “आम्ही दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याचे, तणाव वाढवणाऱ्या कोणत्याही कृती टाळण्याचे आणि शांतता व स्थिरता राखण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करतो. आम्ही इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जवळचे शेजारी आणि प्रमुख इस्लामिक देश मानतो", असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणालेत.

दरम्यान, इराणने पाकिस्तानवरील हल्ल्याआधी इराक आणि सीरियावरही क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्रायलच्या मोसाद या हेरगिरी संस्थेचे इराकच्या स्वायत्त कुर्द प्रांताची राजधानी अर्बिल शहरातील मुख्यालय आणि इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचे सीरियातील तळ इराणने लक्ष्य बनवले.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

KDMC Election : पहिल्याच दिवशी ३११ कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

BMC Election : मुंबई फक्त राजकीय आखाडाच आहे का?