PC - X
आंतरराष्ट्रीय

Pakistan : कराचीत शॉपिंग मॉलला भीषण आग; मृतांचा आकडा २६ वर, ८१ अद्यापही बेपत्ता; ३४ तासांनंतर आगीवर नियंत्रण

आगीत मृत्युमुखी पडलेल्या केवळ सहा जणांची आतापर्यंत ओळख पटली आहे. उर्वरित मृतदेह इतक्या भीषण अवस्थेत आहेत की, ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

Krantee V. Kale

पाकिस्तानच्या कराची शहरातील एका बहुमजली शॉपिंग मॉलला (गुल प्लाझा) लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा २६ वर पोहोचला असून, अजूनही अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शनिवारी रात्री १० च्या सुमारास लागलेली आग, तब्बल ३४ तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर बचाव पथकांनी इमरातीत प्रवेश केला. सुमारे ८१ जणांचा शोध अजूनही सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ओळख पटवणेही कठीण

या आगीत मृत्युमुखी पडलेल्या केवळ सहा जणांची ओळख पटली आहे. उर्वरित मृतदेह इतक्या भीषण अवस्थेत आहेत की, ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे.

नातेवाईकांची गर्दी, बचावकार्य अजूनही सुरू

बचाव पथके अजूनही इमारतीत अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. या आगीत एका अग्निशमन कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाल्याचे सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी पाकिस्तानी रुपये (सुमारे ३६ हजार डॉलर) नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे. सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध लागेपर्यंत बचावकार्य सुरूच राहणार आहे. इमारतीच्या काही भागांपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण ठरत असल्याने कामात अडथळे येत आहेत, असे कराचीचे महापौर मुर्तजा वहाब यांनी सांगितले. अडकलेल्या, बेपत्ता किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. सोमवारीही अनेकजण जळालेल्या इमारतीबाहेर थांबून आपल्या प्रियजनांविषयी माहिती मिळण्याची वाट पाहत होते.

दुकानांतील साहित्यामुळे आग भडकली

मॉलमधील अनेक दुकानांमध्ये सौंदर्यप्रसाधने, कपडे आणि प्लास्टिकचा साठा असल्यामुळे आग वेगाने पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कराची शहरात यापूर्वीही अशा अनेक भीषण आगी लागल्या असून, त्या बहुतांशी निकृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि बेकायदेशीर बांधकामांमुळे झाल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये कराचीतील एका मॉलला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला होता, तर २०१२ मध्ये एका कापड कारखान्यातील आगीत तब्बल २६० जणांचा बळी गेला होता.

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी

तपासणीच्या बहाण्याने विमानतळ कर्मचाऱ्याचे कोरियन महिलेसोबत अश्लील कृत्य; पुरुषांच्या वॉशरूमजवळ घेऊन गेला अन्...