पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून सर्व शैक्षणिक संस्थांनाही तत्काळ बंद करण्यात आले आहे.
"पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी संपूर्ण प्रांतात आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे," असे पंजाब सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. पंजाब पोलिसांसह सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
राज्यातील सर्व रुग्णालयांतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले असून पंजाबमधील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सिव्हिल डिफेन्ससह संबंधित संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही तात्काळ बोलावण्यात आले आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पूर्णतः बंद करण्यात आलेले पाकिस्तानचे हवाई क्षेत्र आता अंशतः पुन्हा सुरू करण्यात आले आहे. बुधवारी सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
पाक लष्कर म्हणते २६ नागरिकांचा मृत्यू
भारताने मध्यरात्रीनंतर केलेल्या हल्ल्यांमध्ये पंजाब प्रांतातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) किमान २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाले आहेत, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. तर, “भारतीय कारवाईत कोणतेही लष्करी अथवा नागरी स्थळ लक्ष्य केले गेलेले नाही. हा हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी केला होता. मात्र पाकिस्तानकडून कोणतीही चूक किंवा आगळीक झाल्यास परिस्थिती चिघळू शकते,”असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला यापूर्वीच दिला आहे.
दरम्यान, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यावर पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे एअर स्ट्राईक करुन उडवले. त्यानंतर नियंत्रण रेषेवर भारत-पाक तणाव अधिक तीव्र झाला आहे.