इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा रेल्वे स्थानकामध्ये शनिवारी सकाळी घडविण्यात आलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १४ सैनिकांसह २७ जण ठार झाले असून अन्य ६२ जण जखमी झाले आहेत. 'बलोच लिबरेशन आर्मी' (बीएलए) या वांशिक फुटीरतावादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
जाफर एक्स्प्रेस पेशावरला रवाना होण्यापूर्वी प्रवासी फलाटावर जमले असताना सकाळी हा स्फोट घडविण्यात आला. हा आत्मघातकी स्फोट होता आणि त्यामध्ये २७ जण ठार झाल्याचे क्वेट्टाचे विभागीय आयुक्त हमझा शफकात यांनी सांगितले. आत्मघातकी हल्लेखोर सामान घेऊन रेल्वे स्थानकावर आला होता. एखादी व्यक्ती आत्मघातकी स्फोट घडविण्याच्या उद्देशाने येत असेल तर त्याला ओळखणे कठीण आहे, असेही विभागीय आयुक्त म्हणाले.
'बीएलए'ने जबाबदारी स्वीकारली
'बीएलए'ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले असून, त्या संघटनेने आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान प्रांताच्या विकासाकडे दुर्लक्ष करून सरकार या प्रांतातील स्रोतांचे शोषण करीत आहे, असा 'बीएलए'चा आरोप आहे. सरकारने या आरोपाचे खंडन केले असून परकीय शक्ती घातपात घडविण्यास सहकार्य करीत असल्याचा आरोप केला आहे.
बलुचिस्तानच्या मात्सुंग जिल्ह्यातील मुलींच्या शाळेजवळ घडविण्यात आलेल्या स्फोटानंतर एका आठवड्याने हा स्फोट घडविण्यात आला आहे. मात्सुंगमधील स्फोटात पाच मुलांसह आठ जण ठार झाले होते. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे प्राथमिक - तपासामधून निदर्शनास येत आहे, असे अन्य एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
रेल्वे स्थानकाचे छप्पर उडाले
या घटनेचे वृत्त कळताच सुरक्षा यंत्रणा आणि मदतकार्य पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. या परिसराला वेढा घालण्यात आला आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अतिरिक्त वैद्यकीय पथके रुग्णालयात रवाना करण्यात आली असून आतापर्यंत ४६ जखमींना दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे रेल्वे स्थानकाचे छप्पर उडाले असून स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आल्याचे काही जणांनी सांगितले. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या घटनेचा निषेध करीत तपासाचे आदेश दिले आहेत. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात गेल्या वर्षभरात स्फोटांच्या प्रमाणांमध्ये वाढ झाली आहे. महिला, कामगार, लहान मुले यांना लक्ष्य केले जात आहे.