मॉस्को : युद्धकैद्यांच्या अदलाबदलीसाठी युक्रेनच्या ६५ युद्धकैद्यांना घेऊन जाणाऱ्या विमानाला बुधवारी रशियात अपघात झाला असून त्यात एकूण ७४ जण मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे. हे विमान युक्रननेच क्षेपणास्त्र डागून पाडल्याचा आरोप रशियाने केला आहे. युक्रेनने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अपघाताबद्दल खातरजमा न केलेली माहिती पसरवू नये, असे आवाहन युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात साधारण दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या अनेक सैनिकांना कैद केली आहे. बुधवारी यातील काही युद्धकैद्यांची देवाणघेवाण होणार होती. त्यासाठी रशियन सेनादलांचे आयएल-७६ प्रकारचे मालवाहू विमान मॉस्कोजवळच्या चकलोवस्की हवाई तळावरून बेल्गोरॉड येथे जात होते. या विमानात युक्रेनचे ६५ युद्धकैदी, विमानाचे ६ कर्मचारी आणि ३ अन्य प्रवासी असे एकूण ७४ जण होते. हे विमान बेल्गोरॉडपासून ७० किमी अंतरावरील याब्लोनोव्हो गावाजवळ कोसळले. अपघातानंतर विमानाला आग लागली. अग्निशमन दलाची वाहने आणि कर्मचारी, तसेच डॉक्टरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विमानाला लागलेल्या आगीत सर्व ७४ जण होरपळून मरण पावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विमान ज्या कोरोचान्स्की विभागात पडले, त्याचे गव्हर्नर व्याचेस्लाव्ह ग्लाडकोव्ह यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये विमानातील सर्वजण मरण पावल्याचे म्हटले आहे.
रशियाचा युक्रेनवर घातपाताचा आरोप
हे विमान युक्रेनने क्षेपणास्त्र डागून पाडल्याचा आरोप ड्युमाचे (रशियन संसदेचे) सदस्य व्याचेस्लाव्ह वोलोदीन यांनी केला आहे. त्यासाठी पाश्चिमात्य देशांनी पुरवलेले क्षेपणास्त्र वापरण्यात आल्याचेही वोलोदीन यांनी म्हटले आहे. 'मानवतावादी मोहिमेवर असलेल्या आपल्या वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना पाडण्यात आले’, असे त्यांनी संसदेत सांगितले.