ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी परदेशी नेत्यांसाठी प्रदान करण्यात येणारा उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘ओलीय दर्जाली दोस्तलिक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारत आणि उझबेकिस्तानमधील ‘शाश्वत’ संबंधांना समर्पित केला.
व्यापार, स्वच्छ ऊर्जा आणि दळणवळणासह विविध क्षेत्रांतील संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी सध्या उझबेकिस्तानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शाैकत मिर्झियोयेव्ह यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
‘ओलीय दर्जाली दोस्तलिक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अत्यंत सन्मान वाटत आहे. मी हा पुरस्कार भारत आणि उझबेकिस्तानमधील शाश्वत संबंधांना समर्पित करतो,’ असे मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ वर म्हटले की, ‘दोन्ही देशांमधील मैत्री मजबूत करण्यात योगदान दिल्याबद्दल’ पंतप्रधानांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील १४० कोटी जनतेला समर्पित केला आणि हा पुरस्कार दोन्ही संस्कृतींमधील शाश्वत मैत्रीचे प्रतीक असल्याचे अधोरेखित केले,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले.
मोदी म्हणाले की, हा पुरस्कार मिळणे हा त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. भारतातील लोक या पुरस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘दोस्तलिक’ या शब्दाशी खूप परिचित आहेत. भारतात असे एकही कुटुंब नसेल जिथे दिवसातून शंभर वेळा ‘दोस्तलिक’ हा शब्द वापरला जात नाही. आज तुम्ही खऱ्या अर्थाने त्याचा मूळ भाव समोर आणला आहे. ‘दोस्तलिक’ म्हणजे मैत्री. हा शब्द स्वतःच भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संबंधांच्या केंद्रस्थानी असणारी भावना सुंदरपणे व्यक्त करतो,’ असे ते म्हणाले.
‘सर्व भारतीयांच्या वतीने मी उझबेकिस्तानचे नागरिक, तेथील सरकार आणि माझे प्रिय मित्र अध्यक्षांचे मनापासून आभार मानतो. मी हा सर्वोच्च सन्मान पूर्ण नम्रतेने स्वीकारतो आणि तो आपल्या दोन देशांमधील शतकानुशतके जुनी मैत्री आणि आपल्या सामायिक वारशाला समर्पित करतो,’ असे ते म्हणाले.
पंतप्रधान ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ताश्कंदहून किर्गिस्तानला रवाना होणार आहेत.
दोन्ही देशांत ५ अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य निर्धारित
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शाैकत मिर्झियोयेव्ह यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर, रविवारी दोन्ही देशांनी आपले संबंध ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’च्या पातळीवर नेण्याचा आणि २०३० पर्यंत वार्षिक द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतला. खाणकाम आणि पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंनी ११ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच, नागरी अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्याला अनुसरून उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करण्यास मान्यता देण्यात आली.