ढाका : आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात गेले काही दिवस सुरू असलेल्या हिंसाचार व आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी देश सोडून पलायन केले. या सर्व घडामोडींमुळे बांगलादेश सध्या अराजकाच्या खाईत सापडला आहे. दरम्यान, लष्कराने सर्व सूत्रे हाती घेत लवकरच हंगामी सरकार स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर येत जल्लोष केला, तसेच हसीना यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री, मुख्य न्यायाधीश यांच्या निवासस्थानात घुसून तोडफोड केली. दरम्यान, आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा दुपारनंतर सुरळीत झाली आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांना देण्यात येणाऱ्या ३० टक्के आरक्षणाबाबत प्रचंड नाराजी आहे. यामुळे या आरक्षणावरून आंदोलकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर देशात हिंसाचार पेटला. परिणामी गेल्या दोन दिवसांत १०० हून अधिक जण बळी गेले आहेत. शेख हसीना यांच्याविरोधातील नाराजी तसेच आरक्षणाला विरोध करणाऱ्या आंदोलनामुळे देश सध्या हिंसाचाराने होरपळत आहे. यामध्ये मोठ्या संख्येने जीवितहानी तसेच मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
गेली अडीच दशके देशाच्या प्रमुखपदी विराजमान असलेल्या शेख हसीना यांनी सलग चौथ्यांदा पंतप्रधानपद भूषविले होते. २०२४ च्या सुरुवातीला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या पुन्हा सत्तेवर आल्या. ७६ वर्षीय शेख हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबुर रहमान यांच्या कन्या आहेत.
दरम्यान, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश ‘नॅशनलिस्ट पार्टी’च्या नेत्यांची लष्करप्रमुख वकार-उझ-झमन यांनी सोमवारी भेट घेऊन देशातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आपण घेत असून सहकार्य करण्याचे आवाहन दूरचित्रवाणीवरून केले. लष्कर तसेच पोलिसांना जनतेवर गोळीबार न करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले. आंदोलकांनी हिंसा थांबवावी, आपण जनतेच्या न्यायासाठी बांधिल आहोत, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. देशात आणीबाणी लागू करण्याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, बांगलादेशला जाणारी रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली आहे.
मुजिबुर रहमान यांचा पुतळा उखडला
पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर जनतेने हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून जल्लोष केला. राजीनाम्यापूर्वी काहींनी त्यांच्या निवासस्थानी धडक देत वस्तू तसेच मालमत्तेचे नुकसान केले. जमावाने पंतप्रधानांचे राजधानीतील कार्यालयदेखील भस्मसात केले.
देशाचे गृहमंत्री असादुझ्झमन खान यांचे निवासस्थानदेखील आंदोलकांनी नेस्तनाबूत केले. मुख्य न्यायाधीशांचे निवासस्थानदेखील निदर्शकांनी तोडले. आंदोलकांनी हसीना यांचे वडील मुजिबुर रहमान यांचा पुतळा उखडून टाकला.
ढाकाकडे रवाना होणाऱ्या सकाळच्या मोर्चाप्रसंगी नव्याने उद्भवलेल्या हिंसाचारात सहा जणांचा बळी गेला. निदर्शकांचा जमाव वाढत गेला, तशी रस्त्यावर लष्करी जवान व स्थानिक पोलिसांची कुमक अधिक बळकट होत गेली. रविवारच्या आंदोलनातील बळींमध्ये ११ पोलिसांचाही समावेश असल्याचे वृत्त स्थानिक बंगाली वृत्तपत्रांनी दिले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी देशातील राजकीय नेत्यांना आणि सुरक्षा दलाला जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यास तसेच शांततापूर्ण वातावरण राखण्याचे आवाहन केले आहे.
बांगलादेशातील भारतीय सांस्कृतिक केंद्राची नासधूस
ढाकामधील उग्र आंदोलनकर्त्यांनी सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तसेच बंगबंधू स्मृती संग्रहालयाची नासधूस केली. निदर्शकांनी शहरात ठिकठिकाणी लावलेल्या आगींमध्ये संबंधित वास्तूला नुकसान झाले असल्याचे वृत्त ‘ढाका ट्रिब्युन’ने दिले आहे.
एअर इंडियाची उड्डाणे रद्द
बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाच्या एअर इंडियाने ढाका येथील उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीची राजधानी नवी दिल्लीतून ढाकाकरिता दिवसातून दोन उड्डाणे होतात. दिल्ली-ढाका तसेच ढाका-दिल्ली दरम्यानचे कंपनीचे वेळापत्रक तातडीने स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतमार्गे लंडनला पलायनाच्या तयारीत
पंतप्रधानपदाचा दुपारी राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या बांगलादेश एअरफोर्सच्या ‘सी-१३०जे’ विमानाने भारतातील गाझियाबाद विमानतळावर उतरल्या. येथून त्या लंडनला रवाना होणार आहेत. यादरम्यान त्यांनी त्यांची कन्या सायमा वाझेद हिची भेट घेतल्याचे समजते. सायमा या दिल्लीत ‘डब्ल्यूएचओ’च्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हसीना यांची विमानतळावरच भेट घेतल्याचे सांगितले जाते, तर केंद्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी बांगलादेशातील घडामोडींबाबत तातडीची बैठक घेऊन चर्चा केली.
भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट
शेजारच्या राष्ट्रातील सत्तांतरानंतर सीमेवरील सुरक्षा अधिक कडकोट करण्यात आली आहे. बांगलादेशमधील स्थिती लक्षात घेता भारताच्या दक्षिण-पूर्वेकडील सीमेवर गेल्या दोन दिवसांपासूनच बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे भारतीय सीमा सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे.
माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी विरोधी पक्षनेत्या व माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.