सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी या डॉक्टर तरुणीने तळहातावर सुसाइड नोट लिहून दोन जणांवर गंभीर आरोप केले होते. या धक्कादायक घटनेत आता मोठी घडामोड समोर आली आहे.
गोपाळ बदने शरण
आत्महत्येप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने अखेर पोलिसांसमोर हजर झाला आहे. शनिवारी (दि.२५) रात्री उशिरा त्याने फलटण पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून ही या प्रकरणातील दुसरी अटक आहे. त्याआधी पोलिसांनी दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली होती.
गोपाळ बदने पोलिस ठाण्यात शरण आला तेव्हा परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीला रविवारी (दि. २६) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोन्ही आरोपींवर डॉक्टर तरुणीवर बलात्कार केल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि छळ केल्याचा गंभीर आरोप आहे.
एकाची पोलिस कोठडीत रवानगी
या प्रकरणातील महिला डॉक्टर संपदा मुंडे ही बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होती. आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने बदने व बनकर यांनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले होते. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची तत्काळ दखल घेत बदनेला निलंबित केले. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी जोरदार मोहीम राबवली. प्रशांत बनकर याला सातारा पोलिसांनी पुण्यातून अटक केली असून त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, आता गोपाळ बदने याच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.