पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा येथे रेल्वे ट्रॅकजवळ झालेल्या भीषण स्फोटात किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. चमन फाटक परिसरात हा स्फोट झाला. या स्फोटामुळे क्वेट्टा कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.
सैन्य जवानांचाही मृतांमध्ये समावेश
या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये काही सैन्य जवानांचाही समावेश असल्याचं वृत्त आहे. स्फोट इतका जोरदार होता की परिसरातील अनेक वाहनांचंही नुकसान झाले आहे. रेल्वे रुळांलगत उभ्या असलेल्या किमान १० वाहनांना धक्का बसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनास्थळी धुराचे लोट आणि आगीचे दृश्य
घटनास्थळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये रेल्वेचे नुकसान झालेले डबे आणि आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात पसरल्याचंही दिसून आले.
बचावकार्य आणि तपास सुरू
स्फोटानंतर सुरक्षा दल आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून परिसराला सुरक्षा घेराही घालण्यात आला आहे. सध्या रेल्वे ट्रॅक साफ करण्याचं कार्य सुरू आहे.
बलुचिस्तानमध्ये वाढत्या हल्ल्यांची मालिका
बलुचिस्तानमध्ये मागील काही वर्षांपासून रेल्वे आणि सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करून हल्ले होत आहेत. यापूर्वीही 'जाफर एक्स्प्रेस'सारख्या रेल्वेवर हल्ले झाले होते. या स्फोटाची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.