प्रतिकात्मक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

"तुझ्या देशात परत जा"; शीख महिलेवर बलात्कार, ब्रिटनमधील धक्कादायक घटना

विदेशात भारतीयांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. ब्रिटनमधील ओल्डबरी येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील २० वर्षीय ब्रिटिश वंशाच्या शीख तरुणीवर दोन अज्ञात पुरुषांनी बलात्कार करून मारहाण केली.

नेहा जाधव - तांबे

विदेशात भारतीयांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. ब्रिटनमधील ओल्डबरी येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील २० वर्षीय ब्रिटिश वंशाच्या शीख तरुणीवर दोन अज्ञात पुरुषांनी बलात्कार करून मारहाण केली. “तुझ्या देशात परत जा” म्हणत वांशिक शिवीगाळ करत आरोपींनी हे अमानुष कृत्य केल्याचे समजते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास टेम रोडजवळील उद्यानात घडली. आरोपींनी पीडितेला मारहाण केली आणि “तुम्ही या देशाचे नाही.. तुमच्या देशात परत जा'' असे म्हणत वांशिक अपशब्द उच्चारले. पीडितेने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी एका संशयिताचे स्केच प्रसिद्ध केले आहे. त्याचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याने राखाडी रंगाचा झिप-अप हुडी, काळा ट्रॅकसूट आणि काळे हातमोजे घातले होते. दुसऱ्या आरोपीबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणी कोणतीही माहिती मिळाल्यास ती त्वरित कळवावी.

शीख समुदाय संतप्त

या घटनेनंतर स्थानिक शीख समुदायात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शीख फेडरेशन (यूके), शीख युथ यूकेसह अनेक सामाजिक संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

भारतीयांवरील वाढते हल्ले

विदेशातील भारतीय व दक्षिण आशियाई समुदायावरील हल्ल्यांची ही पहिलीच घटना नाही. याआधी १५ ऑगस्ट रोजी वोल्व्हरहॅम्टनमध्ये दोन शीख टॅक्सी चालकांवर हल्ला झाला होता, ज्यात एका चालकाची पगडी फाडण्यात आली. तर अमेरिकेतील टेक्सासमध्ये काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवस्थापक चंद्रा मौली नगमाल्ले यांची त्यांच्या पत्नी व मुलासमोरच निघृण हत्या करण्यात आली.

या सलग घटनांमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय व दक्षिण आशियाई वंशाच्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

पूल बंद; हाल सुरू! एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम अखेर सुरू; दादर, परळमध्ये प्रचंड वाहतूककोंडी, गैरसोयीने परिसरातील रहिवासी संतप्त

एलफिन्स्टन येथे उभारला जाणार पहिला डबलडेकर पूल