कीव्ह : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे. अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर रविवारी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये दाखल झाले. युक्रेनचा हा त्यांचा पहिलाच अधिकृत दौरा आहे.
मॉस्कोमध्ये शनिवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांचा हा दौरा होत आहे. दोन्ही देशांकडून हवाई हल्ले तीव्र होत असताना शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, अमेरिकेच्या प्रतिनिधींशी ‘रचनात्मक’ चर्चा करण्यासाठी कीव्ह तयार आहे. युद्धाचा अंत जवळ आणण्यात आम्हाला रस आहे. शांतता आवश्यक आहे. सुरक्षेची हमी आवश्यक आहे. न्याय्य आणि दीर्घकाळ टिकणारी युद्धोत्तर शांतता आवश्यक आहे. आमचे प्रस्ताव तयार आहेत, असे त्यांनी टेलिग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले.
युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या प्रयत्नांना आता काहीसा वेग कमी झाला आहे. सहा महिन्यांपासून अमेरिकेचे लक्ष इराणमधील युद्धावर केंद्रित आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आणि विटकॉफ यांनी यापूर्वी जानेवारीमध्ये मॉस्कोला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी क्रेमलिनमध्ये पुतिन यांच्याशी चर्चा केली होती.
मॉस्कोतील चर्चेत ठोस प्रगती नाही
मॉस्कोमध्ये झालेली बैठक तीन तासांहून अधिक काळ बंद दाराआड सुरू होती. या बैठकीनंतर कोणतीही ठोस प्रगती झाल्याची घोषणा करण्यात आली नाही. पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी बैठकीचे वर्णन ‘रचनात्मक, स्पष्ट आणि उपयुक्त’ असे केले; मात्र चर्चेतील ठोस निष्कर्ष त्यांनी सांगितले नाहीत.
मॉस्कोकडून युक्रेनमधील युद्धभूमीवरील परिस्थितीचे ‘सर्वंकष मूल्यमापन’ मांडण्यात आले, असे उशाकोव्ह यांनी सांगितले. मात्र ही चर्चा केवळ युक्रेनमधील युद्धापुरती मर्यादित नव्हती. आर्थिक मुद्द्यांवर तसेच रशिया आणि अमेरिकेसाठी परस्पर फायदेशीर ठरू शकणाऱ्या संभाव्य मोठ्या संयुक्त प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली,’ असे त्यांनी सांगितले. चर्चा सुरू असताना एकमेकांच्या राजधानींवर हल्ले थांबविण्यास पुतिन आणि झेलेन्स्की यांनी सहमती दर्शविली होती. मात्र रविवारी पहाटेपर्यंत दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरूच राहिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, रविवारी पहाटेपर्यंत देशातील अनेक भागांवर झालेल्या रशियन हल्ल्यांत एकाचा मृत्यू झाला, तर किमान १० जण जखमी झाले.
झापोरिझ्झिया येथे ड्रोन हल्ल्यात ७४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. ख्मेल्नित्स्की भागात ड्रोनने एका निवासी इमारतीचे नुकसान केले. या घटनेत सात जण जखमी झाले.
युक्रेनच्या हवाई दलाने रविवारी सांगितले की, रशियाने रात्री डागलेल्या १०८ ड्रोनपैकी ८२ ड्रोन पाडण्यात आले. याशिवाय सहा क्षेपणास्त्रांनाही लक्ष्य करण्यात आले.
रशियात बेलगोरोदच्या सीमावर्ती भागात युक्रेनियन ड्रोनने एका वाहनाला धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले की, रात्रीच्या वेळी रशियातील १४ प्रदेश, रशियाच्या ताब्यातील क्रिमिया तसेच काळा समुद्र आणि अझोव्ह समुद्राच्या परिसरात युक्रेनचे २५८ ड्रोन पाडण्यात आले.
यामध्ये ६७ वर्षीय नतालिया लिपेई यांचाही समावेश होता. त्यांचा मुलगा व्हिक्टर डिसेंबर २०२२ मध्ये युद्धात मारला गेला. प्रकृतीची समस्या असतानाही त्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करत आहेत. मॉस्को आणि कीव्हमधील चर्चेतून अखेर युद्धाचा अंत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या चर्चा आणि बैठका निश्चितच काही परिणाम घडवून आणतील, अशी मला आशा आहे. येथे खूप रक्तपात झाला आहे आणि अनेकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व आता थांबविले पाहिजे,” असे त्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले.
श्रद्धांजलीसाठी देशव्यापी मौन
रविवारी कीव्हमध्ये युक्रेनच्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी मौन पाळण्याच्या कार्यक्रमात डझनभर नागरिक सहभागी झाले. देशातील विविध शहरांमध्ये हा रोजचा उपक्रम आयोजित केला जातो.