बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी सोमवारी (दि. १७) ऐतिहासिक निकाल देण्यात आला आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गंभीर आरोपांत दोषी ठरवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) मृत्यूदंडाची (फाशीची) शिक्षा सुनावली आहे.
अनुपस्थितीतच सुनावणी
या आंदोलनानंतर देशातील तणाव वाढताच शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. त्यांच्या अनुपस्थितीतच संपूर्ण खटला चालवण्यात आला. मुख्य न्यायाधीशांनी ४५८ पानांच्या या निकालाचे सहा भागांमध्ये वाचन करून शिक्षा घोषित केली.
आंदोलनात भीषण हिंसा
जुलै ते ऑगस्ट २०२४ या दोन महिन्यांत देशभर उसळलेल्या आंदोलनात १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २५ हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. हिंसक आंदोलन आवरण्यासाठी हसीना सरकारकडून कठोर कारवाई करण्यात आली होती. मुख्य सरकारी वकील ताजुल इस्लाम यांनी न्यायालयात सांगितले, की आंदोलनादरम्यान निशस्त्र आंदोलकांवर गोळीबाराचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयाने ५४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. देशभरातून गोळा केलेले पुरावे, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालांसह विविध स्रोतांतील माहिती तपासून न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.
कोर्टाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण नोंदी
हिंसा दडपण्यासाठी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी सलग बैठकांचे आयोजन
आंदोलकांना लक्ष्य करण्याचे दिलेले स्पष्ट आदेश
अवामी लीग समर्थकांचा थेट सहभाग
पोलीस आयजीपीने चौकशीत दिलेल्या कबुली
ढाका विद्यापीठाच्या कुलगुरूंशी फोनवर झालेली संभाषणे
विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचे दिलेले निर्देश असणारी कॉल रेकॉर्डिंग
निर्णयानंतर तणावग्रस्त वातावरण
निकाल जाहीर होताच बांगलादेशातील परिस्थिती पुन्हा तणावग्रस्त झाली आहे. अनेक शहरांमध्ये पोलिस आणि सैन्य तैनात करण्यात आले असून हिंसा भडकू नये म्हणून बांगलादेश प्रशासनाने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.