इस्लामाबाद : इस्लामाबादमधील शिया मशिदीमध्ये शुक्रवारचा नमाज सुरू असतानाच एका आत्मघातकी हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात किमान ३१ जण ठार झाले असून अन्य १६९ जण जखमी झाले आहेत. अलीकडच्या काळात शिया समाजाला लक्ष्य करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
इस्लामाबादच्या तरलाई परिसरात खादीजतूल कुबरा मशिदीत हा शक्तिशाली स्फोट घडविण्यात आला. स्फोट इतका शक्तिशाली होता की दूरपर्यंत स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकावयास आला. आत्मघातकी हल्लेखोराला मशिदीच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले, मात्र त्याने स्वत:ला स्फोटाद्वारे उडविले, असे पोलीस आणि प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
या स्फोटात ३१ जण ठार झाले असून १६९ जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, आत्मघातकी हल्लेखोर परदेशी नागरिक होता आणि त्याचे फितना अल ख्वाराजीशी (तहरिक - ए-तालिबान पाकिस्तान) लागेबांधे होते. हल्लेखोराने प्रथम गोळीबार केला आणि त्यानंतर स्फोटकांच्या सहाय्याने स्वत:ला उडविले,असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक मृतदेह रस्त्यावर पडलेले आणि आजूबाजूला काचा आणि दगडमातीचा ढिगारा पसरल्याचे दिसत होते. पाकिस्तान लष्कर आणि रेंडर्सनी परिसराला वेढा घातला असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात येत आहे. उझबेकचे अध्यक्ष शाव्हकत मिरझीयोयेव्ह पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले असतानाच हा हल्ला झाला आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि विरोधी पक्षनेते अल्लमा राजा नसिर अब्बास यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे, असे झरदारी यांनी म्हटले आहे.