छाया सौ - X
आंतरराष्ट्रीय

४० ठार, १०० जखमी; नववर्षाच्या पार्टीदरम्यानच बारमध्ये भीषण स्फोट; स्वित्झर्लंडच्या आलिशान 'स्की रिसॉर्ट'मध्ये मोठी दुर्घटना

स्वित्झर्लंडमधील क्रॅन्स-मोंटाना या शहरातील आलिशान 'स्की रिसॉर्ट'मध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान मोठी दुर्घटना घडली. हा स्फोट रात्री सुमारे १.३० वाजता झाला. नववर्षाच्या स्वागतासाठी बारमध्ये १०० हून अधिक जण उपस्थित होते. बार साधारणतः रात्री २ वाजेपर्यंत खुला असतो आणि त्याची क्षमता सुमारे ४०० लोकांची आहे.

Krantee V. Kale

स्वित्झर्लंडमधील क्रॅन्स-मोंटाना या शहरातील आलिशान स्की रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान मोठी दुर्घटना घडली. ‘ले कॉन्स्टेलेशन’ नावाच्या बारमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर (एक किंवा अधिक स्फोट ) भीषण आग लागली. या दुर्घटनेत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

हा स्फोट रात्री सुमारे १.३० वाजता झाला. नववर्षाच्या स्वागतासाठी बारमध्ये १०० हून अधिक जण उपस्थित होते. बार साधारणतः रात्री २ वाजेपर्यंत खुला असतो आणि त्याची क्षमता सुमारे ४०० लोकांची आहे. स्थानिक वृत्तपत्र ले नुवेलिस्तने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. पोलिसांनी मात्र हा स्फोट दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी अनेकजण मृत्यूमुखी पडल्याचे आणि जखमी झाल्याची माहिती दिली असली तरी अधिकृत आकडे अद्याप जाहीर केलेले नाहीत.

बारच्या तळघरात स्फोट?

स्विस प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, बारच्या तळघरात स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. काही माध्यमांनी कॉन्सर्टदरम्यान वापरण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र पोलिसांनी याबाबत कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. पोलिस प्रवक्ते गेटन लॅथिऑन यांनी सांगितले की, “हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”

२०१२ मधील दुर्घटनेशी तुलना

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या असून अनेक रुग्णवाहिका आणि एअर-ग्लेशियर्स हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेनंतर बराच वेळ बारच्या बाहेर रुग्णवाहिका उभ्या होत्या. काचा फुटलेल्या दिसत होत्या आणि परिसरात जळण्याचा वास पसरलेला होता, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने या घटनेला “मोठी आपत्ती” असे संबोधले असून, २०१२ मध्ये सिएरे येथे झालेल्या बस अपघाताशी या दुर्घटनेची तुलना केली आहे, ज्यात २८ जणांचा मृत्यू झाला होता.

क्रॅन्स-मोंटानावर ‘नो-फ्लाय झोन’

सध्या या प्रकरणात गुन्हेगारी कृत्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. अपघाती कारणाची शक्यता नाकारण्यात आलेली नसली तरी स्फोट आणि आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण परिसर नागरिकांसाठी बंद केला असून क्रॅन्स-मोंटानावर ‘नो-फ्लाय झोन’ लागू करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “रात्री संपूर्ण वेळ हेलिकॉप्टरचा आवाज येत होता.”

नववर्षाचा आनंद एका क्षणात शोकात बदलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

Mumbai : अक्षय कुमारचे मुंबईकरांना स्वच्छतेचे आवाहन; स्वच्छ मुंबई स्पर्धा सुरू

वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महिन्याला एक हजार कसे पुरणार? EPF पेन्शन वाढवण्याची संसदीय समितीची शिफारस

साताऱ्यात १० पंचायत समित्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व; दोघांना प्रत्येकी ५, शिवसेनेला १ सभापतीपद; राष्ट्रवादीच्या तिघांचा भाजपमध्ये प्रवेश