वॉशिंग्टन : भारतासह अनेक देशांवर भरमसाट आयात शुल्क आकारल्यानंतर भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील आठ युद्ध थांबविल्याचा दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा भारताबद्दल नवा दावा केला आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी भारत थांबविणार असल्याचा शब्द आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केल्याने खळबळ माजली आहे.
तेल व गॅसच्या किमती आणि त्यांचा सुरक्षित पुरवठा निश्चित करणे ही आमच्या ऊर्जा धोरणाची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. यामध्ये आमच्या ऊर्जा स्रोतांचा विस्तार वाढवणे आणि बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे यांचा समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेचा विचार केला तर, आम्ही अनेक वर्षांपासून आमची तेल आणि गॅस खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दशकात यात सातत्याने प्रगती झाली आहे. सध्याच्या प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यात रस दाखवला आहे. यावर चर्चा सुरू आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
चीनलाही झुकवणार
युक्रेनमधील युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल असून आता आम्ही चीनलाही हेच करायला लावणार आहोत, असेही ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले. चीनसोबतच्या तणावाच्या काळात भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहता का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, ऊर्जा धोरणावरून वाद असूनही नरेंद्र मोदी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते माझे मित्र आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
ब्रिटिश पंतप्रधान भारत दौऱ्यावरून परतल्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाची आर्थिक ताकद कमी करणे, युक्रेन युद्धात रशियाला होणारे फंडिंग रोखणे हा या निर्णयाचा हेतू आहे, असे ब्रिटिश सरकारने सांगितले. रशिया आता जागतिक तेल बाजारपेठेतून हळूहळू बाहेर होत आहे. कुठलाही देश अथवा कंपनीने रशियाच्या तेल व्यापाराला मदत करू नये यासाठी ब्रिटन प्रयत्नशील आहे. आम्ही अशा सर्व कंपन्यांवर दबाव निर्माण करू जे रशियाला मदत करतात. मग तो भारत असेल अथवा चीन, रशियाच्या तेलासाठी आता जागतिक बाजारपेठेत जागा नाही, असे ब्रिटनने म्हटले आहे.
‘नयारा एनर्जी’वर निर्बंध
भारताची ‘नयारा एनर्जी’ एक प्रमुख खासगी तेल रिफायनरी कंपनी आहे. त्यांनी मागील वर्षी रशियाकडून ‘रेकॉर्ड ब्रेक’ तेल खरेदी केले होते. रिपोर्टनुसार, २०२४ साली ‘नयारा एनर्जी’ने १०० मिलियन बॅरल रशियातून कच्चे तेल खरेदी केले. ज्याची किंमत जवळपास ५ बिलियन डॉलर म्हणजे ४१ हजार कोटी आहे. भारत आणि चीनच्या काही कंपन्या रशियाकडून तेल खरेदी करून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत, त्यावर ब्रिटनने नाराजी व्यक्त केली. ही खरेदी रशियाला युक्रेनसोबतच्या युद्धात आर्थिक ताकद देते, असा ब्रिटनचा आरोप आहे. त्यासाठी ‘नयारा एनर्जी’वरील निर्बंध ब्रिटनच्या त्या प्रयत्नांचा भाग आहेत, ज्यात ते रशियाला आर्थिक मदत करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.
मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात - राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी खोचक टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करणार असल्याचा शब्द दिला असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच केला आहे. या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, टॅरिफ वाढ आणि भारत-पाकिस्तान सशस्त्र संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केल्यानंतरही मोदी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत राहिले.
पाच प्रसंगांचा दाखला
भारत रशियन तेल खरेदी करणार की नाही, हे ठरविण्याची आणि जाहीर करण्याची ट्रम्प यांना परवानगी देणे, ट्रम्प वारंवार अवहेलना करत असूनही त्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवणे, अर्थमंत्र्यांचा अमेरिकेचा दौरा रद्द करणे, इजिप्तमधील शर्म-अल-शेखची बैठक टाळणे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याचे खंडन न करणे, अशा पाच प्रसंगांचा दाखला देत राहुल गांधींनी मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात, असे म्हटले आहे.
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार - परराष्ट्र मंत्रालय
भारत हा तेल आणि गॅसचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे, असे स्पष्ट करीत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल रशियाकडून तेल खरेदी सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. आमची आयात धोरणे पूर्णपणे ग्राहक केंद्रित आहे. आपल्या नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून कच्चे तेल आयात धोरण आम्ही ठरवतो, असे त्यांनी सांगितले.
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी रशियन तेल महत्त्वाचे - रशिया
भारत आणि रशियाचे संबंध विश्वासाच्या भक्कम पायावर उभे असून रशियन तेल भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे, असे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये रशिया हस्तक्षेप करू इच्छित नाही. भारत आणि अमेरिका त्यांचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र आमचे तेल भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय जनतेसाठी फायदेशीर आहे, असे ते म्हणाले.
अमेरिकेनंतर आता ब्रिटनचा भारताला झटका
ब्रिटनने रशियाविरोधात आणखी कठोर आर्थिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या टार्गेटवर केवळ रशिया नाही तर भारत आणि चीनच्या तेल कंपन्याही आल्या आहेत. ब्रिटिश सरकारने युक्रेनसोबत चाललेल्या युद्धामुळे रशियाचे फंडिंग रोखण्यासाठी नवीन आर्थिक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमध्ये भारतातील मोठी ऊर्जा कंपनी ‘नयारा एनर्जी’च्या नावाचाही समावेश आहे. ही कंपनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करते.