आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांचा आणखी 'टॅरिफ'चा डोस; आता औषधांवर १०० टक्के शुल्क

भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा औषधांकडे वळविला आहे. परदेशातून येणाऱ्या औषधांवर येत्या १ ऑक्टोबरपासून १०० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी शुक्रवारी केली.

Swapnil S

वॉशिंग्टन : भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा औषधांकडे वळविला आहे. परदेशातून येणाऱ्या औषधांवर येत्या १ ऑक्टोबरपासून १०० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी शुक्रवारी केली. त्याचप्रमाणे किचन कॅबिनेट्स आणि बाथरूम व्हॅनिटीवर ५० टक्के, फर्निचरवर ३० टक्के आणि हेवी ट्रक्सवर २५ टक्के टॅरिफ लावण्यात येणार असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, १ ऑक्टोबर २०२५ पासून कोणतेही ब्रँडेड किंवा पेटंटेड फार्मास्युटिकल उत्पादन अमेरिकेत होत नसेल तर त्यावर १०० टक्के टॅरिफ लावले जाईल. एखाद्या कंपनीचे प्रत्यक्षात तेथे बांधकाम सुरू असेल तर अशा औषध उत्पादनांवर कर लागू होणार नाही, असेही ते म्हणाले.

ऑगस्टमध्ये लावलेले आयात कर आणि काही व्यापार करार होऊनसुद्धा ट्रम्प अजूनही टॅरिफ लावण्याच्या बाजूने आहेत. ट्रम्प यांचा विश्वास आहे की, या टॅरिफमुळे सरकारची अर्थसंकल्पीय तूट कमी होईल आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे महागाई आणखी वाढू शकते आणि आर्थिक विकासावरही परिणाम होईल. विशेषत: औषधांवरील टॅरिफचा परिणाम भारताच्या फार्मा उद्योगावर पडण्याची शक्यता आहे.

भारतावर काय परिणाम?

ट्रम्प यांच्या औषधांच्या आयातीवर १०० टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचा भारतातील औषध निर्माण उद्योगावर परिणाम होऊ शकतो. याचे कारण म्हणजे, भारतातील औषध उत्पादकांसाठी अमेरिका सर्वात मोठा बाजार आहे. २०२४ मध्ये भारताकडून अमेरिकेला ३१ हजार ६२६ कोटी (३.६ अब्ज डॉलर) किमतीच्या औषधांची निर्यात झाली होती. तर, २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांतच हा आकडा ३२ हजार ५०५ कोटीपर्यंत (३.७ अब्ज डॉलर) पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, १०० टक्के टॅरिफ लागल्यामुळे अमेरिकेत भारताची स्वस्त औषधेही महागड्या दरात विकली जातील.

कोणत्या कंपन्यांना बसणार फटका?

या टॅरिफचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असलेल्या कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डीज, सन फार्मा, ल्युपिनसह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ट्रम्प यांच्या टॅरिफचा सर्वाधिक परिणाम ब्रँडेड किंवा पेटंट असलेल्या औषधांवर पडण्याची शक्यता असून जेनेरिक औषधांबाबतही अनिश्चितता आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार