वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला असून, आज रात्री एका संस्कृतीचा नाश होईल, असे खळबळजनक विधान मंगळवारी सायंकाळी केले आहे.
दरम्यान, इराणनेही याला जबरदस्त प्रत्तुत्तर दिले असून आपल्यासह एक कोटी ४० लाख इराणी बलिदानाला तयार आहेत असा जबाब अध्यक्ष पेझेश्कियान यांनी दिला आहे. वीज प्रकल्पांच्या रक्षणासाठी मानवी साखळी करण्याचे त्यांनी तरुणांना आवाहन केले आहे.
दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत होर्मूझची खाडी खुली करण्याचा प्रस्ताव बहारीनने मांडला. मात्र रशिया व चीनने नकाराधिकार वापरून तो फेटाळून लावला. दरम्यान, अमेरिकन वेळेनुसार रात्री ८ वाजेपर्यंत इराणने शरणागती पत्करावी, अन्यथा भीषण परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ट्रम्प यांनी नमूद केले. ही वेळ येऊ नये असे मला वाटते, पण तसे घडण्याची शक्यता अधिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या करारावर स्वाक्षरी करावी किंवा विनाशकारी हल्ल्यांना सामोरे जावे, असा पवित्रा अमेरिकेने घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी म्हटले की, ही संस्कृती नष्ट होईल आणि ती पुन्हा कधीही उठू शकणार नाही.
कदाचित काहीतरी क्रांतिकारक आणि अद्भूत घडू शकते, असे सांगत त्यांनी तडजोडीची शक्यता कायम ठेवली आहे. इराणने नमती भूमिका घेतल्यास युद्ध टाळता येऊ शकते, असे संकेतही ट्रम्प यांच्या या विधानावरून मिळत आहेत.
दरम्यान, अमेरिकेकडे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी इराणवर अण्वस्त्र हल्ला करण्याचा कोणताही विचार नसल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स यांनी ‘अमेरिकेकडे अशी काही शस्त्रे आहेत जी अद्याप वापरलेली नाहीत’ असे विधान केल्यानंतर ही स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. वान्स यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली होती.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील जनजीवन विस्कळीत झाले असून तेहरानमधील नागरिक सुरक्षित स्थळांकडे स्थलांतर करत आहेत. अमेरिकेने वीज प्रकल्प लक्ष्य केल्यास पाणीपुरवठा आणि स्वयंपाकाची सोय खंडित होईल, या भीतीने नागरिक उत्तरेकडील किनारी भागाकडे जात आहेत. दरम्यान, इस्रायली हवाई दलाने इराणमधील तेहरान, कराज, तबरीझ, काशान आणि कोम या शहरांमधील ८ पुलांवर हल्ले केले आहेत.
खार्ग बेटांवर हल्ले
इराणचा मोठा पेट्रोलियम साठा असलेल्या खार्ग बेटांवर अमेरिकेने मंगळवारी जोरदार हल्ले केले. खार्ग बेटावरील ५० ठिकाणी हल्ले केले. अमेरिकेने आपल्या हल्ल्यांच्या लक्ष्यांचा विस्तार केला असून त्यात इराणमधील सर्व वीज प्रकल्प आणि पुलांचा समावेश केला आहे. नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार प्रतिबंधित असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अमेरिकेला बजावले आहे. तरीही, इराणने सामुद्रधुनी खुली न केल्यास पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याबाबत आपण ठाम आहोत असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेने दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपत असतानाच, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी मंगळवारी एक मोठे विधान केले आहे. इराणमधील १.४० कोटी जनता आणि मी स्वतः देशासाठी बलिदान देण्यासाठी तयार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता की, जर इराणने 'होरमुझच्या सामुद्रधुनी'वरील आपले नियंत्रण शिथिल केले नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर बॉम्बफेक केली जाईल. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पेझेश्कियान यांनी एक्सवर ही प्रतिक्रिया दिली आहे.
दुबईहून आलेल्या वृत्तानुसार, तेहरानच्या वायव्येला असलेल्या अल्बोर्झ प्रांतात मंगळवारी झालेल्या भीषण हवाई हल्ल्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून इतर २४ जण जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, इराणी नागरिकांनी रेल्वेने प्रवास करणे टाळण्याचे आवाहन इस्रायलने केले आहे. असा प्रवास केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा इस्रायलने दिला आहे. यामुळे आता रेल्वे व्यवस्थेला इस्रायल लक्ष्य करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मानवी साखळी’चे आवाहन
मंगळवारी इराणची राजधानी तेहरानवर हवाई हल्ल्यांचा वर्षाव झाला. या पार्श्वभूमीवर, देशातील महत्त्वाच्या वीज प्रकल्पांचे संरक्षण करण्यासाठी तरुणांनी ‘मानवी साखळी’ उभारावी, असे आवाहन इराणी अधिकाऱ्यांनी केले आहे.
आमचे प्रत्युत्तर अमेरिका विसरणार नाही - इराण
ट्रम्प यांच्या धमकीवर दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने उत्तर देताना सांगितले की, अमेरिका व त्यांच्या सहयोगी देशांना इराणच्या प्राचीन सभ्यतेकडून असे प्रत्युत्तर मिळेल, ते कधीच विसरणार नाहीत.