तेलपुरवठा वाढवण्यावर तीन महासत्तांचे एकमत; अणस्त्र धोका कमी करण्यावरही ट्रम्प-जिनपिंग-पुतिन सहमती  (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

तेलपुरवठा वाढवण्यावर तीन महासत्तांचे एकमत; अणस्त्र धोका कमी करण्यावरही ट्रम्प-जिनपिंग-पुतिन सहमती

संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणा, तेलपुरवठा वाढविणे आणि अण्वस्त्रांचा धोका कमी करण्यासाठी संवाद सुरू ठेवण्यावर अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यात गुरुवारी सहमती झाली. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या तिन्ही देशांच्या नेत्यांच्या ऐतिहासिक बैठकीनंतर चीन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Swapnil S

शेन्झेन : संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणा, तेलपुरवठा वाढविणे आणि अण्वस्त्रांचा धोका कमी करण्यासाठी संवाद सुरू ठेवण्यावर अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यात गुरुवारी सहमती झाली. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या तिन्ही देशांच्या नेत्यांच्या ऐतिहासिक बैठकीनंतर चीन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या (आयसीसी) अधिकारांवरही तिन्ही देशांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे आणि न्यायालयाने आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष क्षि जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ऐतिहासिक बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

तिन्ही जागतिक नेत्यांच्या या महत्त्वाच्या बैठकीतील मुद्द्यांमध्ये युक्रेन आणि इराण युद्धाचा उल्लेख टाळण्यात आला आहे. मात्र, ट्रम्प यांनी, दिवसभरात या दोन्ही विषयांवर नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगितले. तथापि, अमेरिकेने अद्याप बैठकीचा अधिकृत वृत्तांत जारी केलेला नाही.

दरम्यान, अण्वस्त्र नियंत्रण संघटनेचे कार्यकारी संचालक डॅरिल किमबॉल यांनी या बैठकीतून अण्वस्त्र कपातीसाठी दीर्घकालीन चर्चेची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, केवळ राजनैतिक देखावा आणि छायाचित्रांपेक्षा ठोस प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर जागतिक राजकारणात महत्त्वाचा बदल घडविणारी ही बैठक ठरू शकते किंवा केवळ छायाचित्रापुरती मर्यादित राहू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सकारात्मक आणि फलदायी - जिनपिंग

जागतिक आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे, ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी तेल उत्पादन आणि पुरवठा वाढविणे, तसेच अण्वस्त्रांचा धोका कमी करून अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करणे, यावर तिन्ही देशांची सहमती झाली, असे चीनचे अध्यक्ष जिनपिंग म्हणाले.

आम्ही इतिहास घडवत आहोत - ट्रम्प

अण्वस्त्र नियंत्रणाचे नियम निश्चित करणे, युक्रेन आणि इराण युद्ध संपविण्याच्या दिशेने प्रयत्न करणे, हा या बैठकीचा उद्देश होता. अण्वस्त्रांचा धोका कमी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिका, रशिया आणि चीनकडे विशेष क्षमता आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

परस्पर सहकार्य महत्त्वाचे - पुतिन

तिन्ही देशांनी परस्परांचा आदर, समानता आणि हितसंबंधांमध्ये समतोल राखून सहकार्य केल्यास जागतिक सुरक्षा आणि स्थैर्य मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. प्रादेशिक संघर्ष, ऊर्जा व अन्नसुरक्षा, व्यापार आणि संयुक्त राष्ट्रांच्या व्यवस्थेला बळकटी देणे आवश्यक आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ; नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय

सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

Mumbai : दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले; उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश

Mumbai : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार

PF काढा हप्त्यांवर! खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा; सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ