न्यू यॉर्क/वॉशिंग्टन : कुशल परदेशी कर्मचाऱ्यांनी अमेरिकेत यावे, येथील कामगारांना पूर्ण प्रशिक्षण द्यावे आणि कुशल कामगारांनी पुन्हा आपल्या देशात जावे, असा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एच-१बी व्हिसाबाबतचा दृष्टिकोन असावा, असे आपले मत असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी केल्याने त्यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
माझ्या मते, अध्यक्षांचा दृष्टिकोन असा आहे की, कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना ३, ५ किंवा ७ वर्षांसाठी अमेरिकेत आणावे आणि त्यांनी येथील कामगारांना प्रशिक्षण द्यावे आणि त्यानंतर ते परदेशी कामगार परत आपल्या देशात जातील आणि अमेरिकन कामगार त्या ठिकाणी काम करतील, असे बेसेंट यांनी स्पष्ट केले. नवीन व्हिसा धोरणात अमेरिकन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना तात्पुरता एच-१बी व्हिसा देण्याच्या तरतुदीचाही समावेश आहे.
ज्ञान हस्तांतरण
स्कॉट बेसेंट यांनी यावेळी ट्रम्प प्रशासनाच्या आर्थिक अजेंड्यावरही प्रकाश टाकला. त्यांनी १ लाख डॉलरपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी २,००० डॉलरच्या संभाव्य कर सवलतीवरील चर्चेला दुजोरा दिला. स्कॉट बेसेंट यांनी ट्रम्प यांच्या नवीन एच-१बी व्हिसा धोरणाचे वर्णन “ज्ञान हस्तांतरणाचा” प्रयत्न म्हणून केले आहे. ज्याचा उद्देश अमेरिकेचे उत्पादन क्षेत्र पुन्हा उभे करणे हा आहे. हे नवीन धोरण गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या आउटसोर्सिंगला बाजूला ठेवून अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्राला पुन्हा नव्याने उभारणीसाठी आखण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
प्रयत्नांचे प्रतिबिंब
गेल्या २० ते ३० वर्षांपासून आपण अचूक उत्पादनांशी संबंधित नोकऱ्या परदेशांत स्थलांतरित केलेल्या नाहीत. पण, यामुळे आपण लगेच असे म्हणू शकत नाही की, आपण एका रात्रीत जहाजे बांधू. आम्हाला सेमीकंडक्टर उद्योग अमेरिकेत परत आणायचा आहे. यासाठी अॅरिझोनामध्ये मोठ्या सुविधा उभारल्या जातील. बेसेंट यांनी पुढे सांगितले की, एच-१बी व्हिसा कार्यक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचा नवीन दृष्टिकोन, राष्ट्राध्यक्षांच्या महत्त्वाच्या उद्योगांना परत अमेरिकेत आणण्याच्या आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.