ट्रम्पच्या मुदतीचे उरले काही तास; इराणने शांतता प्रस्ताव फेटाळला, संघर्ष चिघळण्याची शक्यता 
आंतरराष्ट्रीय

US-Iran-Israel War : ट्रम्पच्या मुदतीचे उरले काही तास; इराणने शांतता प्रस्ताव फेटाळला, संघर्ष चिघळण्याची शक्यता

गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने सोमवारी अधिकृतपणे फेटाळला. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ खुले करण्यासाठी इराणला दिलेली मुदत संपायला काही तासच शिल्लक राहिलेले असल्याने संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Swapnil S

तेहरान : गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने सोमवारी अधिकृतपणे फेटाळला. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ खुले करण्यासाठी इराणला दिलेली मुदत संपायला काही तासच शिल्लक राहिलेले असल्याने संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे प्रमुख गुप्तहेर खादेमी ठार झाल्याने इराणला आणखी एक धक्का बसला आहे.

पाकने मांडलेला शांतता प्रस्तावाचा मसुदा मान्य नसून कोणाच्याही दबावाखाली चर्चा करणार नाही, अशा शब्दात इराणने फटकारले आहे. दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुदत मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे या युद्धात पुढे काय होणार याकडे जगाचे लक्ष आहे.

मध्यस्थांमार्फत पाठवलेला शांतता प्रस्ताव स्वीकारण्यास इराणने नकार दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दिली. युद्धविराम किंवा कोणत्याही वाटाघाटींबाबतचा निर्णय घेताना इराण आपल्या राष्ट्रीय हितांनाच सर्वोच्च प्राधान्य देईल, असे इराणने पुन्हा स्पष्ट केले.

आयआरजीसीचे खादेमी ठार

इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आयआरजीसीचे गुप्तहेर प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. यासोबतच कुड्स फोर्सच्या अंडरकव्हर युनिटचा प्रमुख असगर बाकेरी यालाही ठार केल्याचा दावा इस्रायलच्या लष्कराने केला आहे.

पार्स गॅस केंद्रावर भीषण हल्ले

दुबई : युद्धविरामाच्या चर्चा सुरू असतानाच इस्रायलने इराणमधील दक्षिण पार्स नैसर्गिक वायू क्षेत्रातील एका महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर सोमवारी मोठा हल्ला केला आहे. यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणमधील या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर शक्तिशाली हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. इराणच्या एकूण पेट्रोकेमिकल उत्पादनापैकी अर्धे उत्पादन याच प्रकल्पातून होते.

हैफामध्ये चार ठार

दुसरीकडे, इराणने उत्तर इस्रायलमधील हैफा शहरावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका निवासी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार जण मृतावस्थेत आढळले आहेत. इराणने आपल्या आखाती शेजारील देशांवरही दबाव कायम ठेवला असून, कुवेत, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाने इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्यासाठी आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवल्याने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांनी वधारून १११ डॉलरवर पोहोचल्या आहेत.

तेल घेऊन भरपूर पैसा कमवला असता - ट्रम्प

वॉशिंग्टन : येते २४ तास इराण आणि अमेरिकेसाठीच नव्हे तर जगासाठी महत्त्वाचे आहेत. इराणवरील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कडक पवित्रा घेतला आहे. मंगळवार ही इराणसाठी अखेरची संधी आहे. इराणचे तेल हे केवळ कब्जा करण्यासाठीच आहे. माझ्या हातात सर्वकाही असले असते तर मी इराण तेल घेऊन भरपूर पैसा कमवला असता, असे वादग्रस्त विधान ट्रम्प यांनी केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, यावेळी जे लोक इराणशी चर्चा करत आहेत ते अत्यंत तार्किक आहेत. इराणच्या जुन्या नेत्यांप्रमाणे ते कट्टर नाहीत. ट्रम्प यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video