न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : १४० कोटी लोकसंख्या असल्याचा अभिमान भारत बाळगतो, पण तो अमेरिकेचा थोडासाही मका विकत घेत नाही. भारताने आपले शुल्क कमी करणे गरजेचे आहे, अन्यथा अमेरिकेसोबत व्यापार करताना त्यांना ‘कठीण काळ’ सहन करावा लागेल, अशी धमकी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी दिली आहे.
भारत, कॅनडा आणि ब्राझीलसारख्या महत्त्वाच्या मित्रदेशांवर शुल्क लादून अमेरिका ‘महत्त्वपूर्ण संबंध’ संपुष्टात आणत आहे का?, या प्रश्नावर ते म्हणाले की, हा संबंध एकतर्फी आहे. ते (देश) आम्हाला विकतात आणि आमचा गैरफायदा घेतात. ते त्यांच्या अर्थव्यवस्थेत आम्हाला रोखतात, पण आमच्या खुल्या बाजारात त्यांच्या मालाची विक्री करून फायदा मिळवतात, असे लुटनिक म्हणाले.
भारताला १४० कोटी लोकसंख्येचा अभिमान आहे. मग ही प्रचंड लोकसंख्या अमेरिकेचा थोडाही मका का विकत घेत नाही? तुम्हाला विचित्र वाटत नाही का की ते आम्हाला सगळं विकतात, पण आमचा मका विकत घेत नाहीत? ते प्रत्येक वस्तूवर शुल्क लावतात, असे लुटनिक म्हणाले.
वाणिज्य सचिव म्हणाले, 'गेल्या अनेक वर्षांचे चुकीचे निर्णय दुरुस्त करावे लागतील. त्यामुळे तोपर्यंत आमच्याकडून उलटे शुल्क लागू करावे लागेल.'
ट्रम्प यांचे मॉडेल तुम्हाला मान्य करावे लागेल!
हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मॉडेल आहे आणि ते तुम्हाला मान्य करावे लागेल अन्यथा तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या ग्राहकासोबत व्यापार करणे कठीण होईल, असे लुटनिक यांनी सांगितले.
ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के शुल्क लादले आहे, ज्यामध्ये रशियन तेल खरेदीमुळे २५ टक्के अतिरिक्त शुल्क समाविष्ट आहे. हे जगातील कोणत्याही देशावर लादलेल्या सर्वाधिक शुल्कांपैकी एक आहे.
अमेरिकेच्या या कारवाईला भारताने "अन्याय्य, अवाजवी आणि बिनबुडाचे" असे संबोधले आहे. रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचे समर्थन करताना भारत सातत्याने सांगत आहे की, आमची ऊर्जा खरेदी राष्ट्रीय हित आणि बाजाराच्या घडामोडींवर आधारित आहे.