आंतरराष्ट्रीय

‘वेदांता’चे मालक अनिल अग्रवाल यांना पुत्रशोक; अमेरिकेत अपघातानंतर उपचार सुरू असताना अग्निवेशला हृदयविकाराचा झटका

मुलाच्या निधनानंतर अनिल अग्रवाल यांनी समाजमाध्यमांवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून दु:ख व्यक्त केले आहे.

Swapnil S

न्यूयॉर्क : प्रसिद्ध उद्योगपती आणि वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे ४९ वर्षीय सुपुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत न्यूयॉर्क येथे निधन झाले. एका अपघातानंतर उपचार सुरू असताना कार्डियाक अरेस्टमुळे (हृदयविकाराचा झटका) त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाच्या निधनानंतर अनिल अग्रवाल यांनी समाजमाध्यमांवर अत्यंत भावूक पोस्ट लिहून दु:ख व्यक्त केले आहे.

मित्रांसोबत स्कीईंग करताना अपघात

अग्निवेश हे अमेरिकेत मित्रांसोबत स्कीईंगसाठी गेले होते. तिथे एका अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर न्यूयॉर्कमधील माऊंट सिनाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत होती, मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

अग्निवेशचे स्वप्न करणार पूर्ण; ७५ टक्के संपत्ती करणार दान

अनिल अग्रवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, ‘अग्निवेशचे स्वप्न भारताला आत्मनिर्भर पाहण्याचे होते. ‘पापा, आपल्या देशात सर्व काही असताना आपण मागे का?’ असा प्रश्न तो नेहमी विचारायचा. मुलाला दिलेला शब्द पाळत अनिल अग्रवाल यांनी जाहीर केले की, त्यांच्याकडे येणाऱ्या एकूण संपत्तीपैकी ७५ टक्क्यांहून अधिक हिस्सा ते समाजकार्यासाठी खर्च करतील आणि उर्वरित आयुष्य अत्यंत साधेपणाने जगतील. देशात कोणताही मुलगा उपाशी राहू नये, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि तरुणांना रोजगार मिळावा, या ध्येयासाठी उर्वरित आयुष्य वेचण्याचा निर्धार अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. माझ्या मुलाने दिलेली प्रेरणा मला स्वस्थ बसू देणार नाही. त्याने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणार, असे अग्रवाल म्हणाले.

बापाच्या खांद्यावर मुलाचे पार्थिव...

मुलाच्या निधनाने खचलेल्या अनिल अग्रवाल यांनी लिहिले, ‘आज माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवस आहे. ४९ वर्षांचा माझा अग्निवेश आज आपल्यात नाही. बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा जावी, यापेक्षा वाईट काय असू शकते?’ त्यांनी अग्निवेशच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि तो केवळ मुलगा नसून माझा मित्र आणि अभिमान होता, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

इस्रोच्या PSLV-C62 मोहिमेला धक्का; प्रक्षेपणानंतर रॉकेटवरील नियंत्रण सुटले, १६ उपग्रह अंतराळात हरपले

Payal Gaming MMS Case : महाराष्ट्र सायबरची डीपफेक क्लीप अपलोड करणाऱ्यांवर कारवाई, आरोपींनी जाहीर माफीही मागितली - Video

४ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी आला आणि… ; परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या

Thane Traffic Update : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभेमुळे आज वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

डोनाल्ड ट्रम्प 'व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'; स्वतःच केले जाहीर; ट्रुथ सोशलवरील पोस्टने खळबळ