महिलांनो उन्हाळ्यात उकाड्यामुळे स्वयंपाक करताना तुम्ही हैराण होत आहात. उन्हाळ्यात वाढलेले तापमान त्यात स्वयंपाक करण्यासाठी वापरत असलेल्या गॅस किंवा स्टोव्हमुळे उष्णता अधिकच वाढते. अशा परिस्थितीत स्वयंपाक करणे म्हणजे एक मोठे आव्हानच असते. तुम्ही देखील यामुळे हैराण आहात तर इथे तुमच्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. यामुळे तुमची स्वयंपाक घरात दमछाक होणार नाही.
स्वयंपाक करण्याची वेळ बदला
उन्हाळ्यात जस जसा दिवस वर येतो तस तसा उकाडा वाढत जातो. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो सकाळी लवकर उठून स्वयंपाक करावा. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला स्वयंपाक करताना वातावरण थंडही असेल. तसेच नंतर उरलेल्या वेळात तुम्ही तुमची काही महत्त्वाची कामे करू शकता. तसेच रात्रीच्या वेळी थोडे उशिरा स्वयंपाक करा. कारण वातावरणात तेव्हा हलका गारवा वाढलेला असतो.
इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसचा वापर करणे
गॅसच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर स्वयंपाक करणे हे उष्णतेपासून वाचवणारे असते. जसे की, इंडक्शन, इलेक्ट्रीक शेगडी इत्यादी. तुमचे बजेट असेल तर काही इको फ्रेंडली उपकरण देखील तुम्ही वापरू शकता. जसे की सोलर कुकर, इलेक्ट्रॉनिक पॉट्स इत्यादी.
व्हेंटिलेशनची सुविधा आवश्यक
उन्हाळ्यात किंवा अन्य कोणत्याही ऋतूत स्वयंपाकघरात व्हेंटिलेशन असणे आवश्यक आहे. तुमच्या घरात त्यासाठी स्वयंपाक घराला मोठी खिडकी असायला हवी. ते नसेल तर exhaust fan बसवून घ्यायला हवा. यामुळे केवळ धूरच बाहेर जात नाही तर एकूण उष्णता कमी होण्यसाठी देखील मदत होते. तसेच स्वयंपाक घराचे दरवाजे देखील खुले ठेवावे.
आरामदायक कपडे वापरणे
स्वयंपाक करताना शक्यतो सैलसर आणि सुती कपडे वापरावे. कारण सुती कपड्यांमध्ये थंड वाटते. याशिवाय घाम येत असेल तर घाम शोषणून घेणारे हेडबँड्स भेटतात त्याचा उपयोग करावा. स्वयंपाक करताना केस नेहमी वरच्या बाजूने बांधून ठेवावे.
झटपट होणारे पदार्थ निवडा
उन्हाळ्यात शक्यतो असे पदार्थ बनवा जे पदार्थ बनवायला फारशी मेहनत लागत नाही किंवा जे झटपट होतात. यामुळे वेळही वाचतो आणि स्वयंपाकही लवकर होतो.
स्वयंपाकाची तयारी हॉलमध्ये करू शकता
स्वयंपाकाची तयारी तुम्ही हॉलमध्ये जिथे एसी, कूलर किंवा फॅन असतो अशा ठिकाणी करू शकता. जसे की भाजी निवडणे, टोमॅटो कापणे इत्यादी...