लाईफस्टाईल

आजपासून बदलले अनेक महत्त्वाचे नियम! LPG सिलिंडरपासून रेल्वे तिकीट, बँकिंगपर्यंत जाणून घ्या नवे अपडेट्स

आजपासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम लागू झाले आहेत. LPG सिलिंडरचे दर, रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगची प्रक्रिया, CKYC 2.0, इंडिया पोस्ट आणि बँकिंग सेवांमध्ये काय बदल झाले, जाणून घ्या.

Mayuri Gawade

ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच आजपासून (दि.१) सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किमतींपासून रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेपर्यंत, बँकिंग सेवा, इंडिया पोस्ट आणि केवायसी प्रणालीतही काही नवे नियम लागू झाले आहेत. त्यामुळे हे बदल नेमके कोणते आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार, हे जाणून घेऊया.

LPG सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल

दर महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणे आजही तेल कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो. व्यावसायिक सिलिंडर महागल्यास हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड डिलिव्हरी सेवांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये नवा नियम

भारतीय रेल्वेने तत्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला आहे. आरक्षण केंद्रांवर टोकन देण्याची वेळ आता तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या वेळेशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आधी टोकन घेण्यासाठी आणि नंतर पुन्हा बुकिंगसाठी रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

CKYC 2.0 लागू

आजपासून बँका आणि काही वित्तीय संस्थांमध्ये CKYC 2.0 प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे एकदा केवायसी पूर्ण केल्यानंतर तीच माहिती ग्राहकाच्या डिजिटल संमतीने विविध वित्तीय संस्थांमध्ये वापरता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन खाते किंवा विमा पॉलिसीसाठी पुन्हा पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होईल.

इंडिया पोस्टचे नवे नियम

इंडिया पोस्टने आजपासून कागदपत्रे आणि पार्सल यांची नवी वर्गवारी लागू केली आहे. पत्रे, बँक पासबुक, चेकबुक, डेबिट-क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या वस्तू आता 'डॉक्युमेंट' श्रेणीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच २४ तास आणि ४८ तासांत पोहोचणाऱ्या नव्या स्पीड पोस्ट सेवांसाठी स्वतंत्र दरही लागू करण्यात आले आहेत.

बँकिंग सेवांमध्ये बदल

काही बँकांनी आजपासून क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्स, वार्षिक शुल्क आणि इतर सेवा शुल्कांमध्ये बदल केले आहेत. काही बँकांनी एसएमएस अलर्टचे शुल्कही सुधारित केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या नव्या शुल्क संरचनेची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

RBI च्या पतधोरणाकडे लक्ष

रिझर्व्ह बँकेची (RBI) पतधोरण समिती ३ ते ५ ऑगस्टदरम्यान बैठक घेणार असून ५ ऑगस्ट रोजी नवे पतधोरण जाहीर होणार आहे. या निर्णयाचा परिणाम गृहकर्जाचे ईएमआय, कर्जावरील व्याजदर आणि मुदत ठेवींवरील व्याजदरांवर होऊ शकतो.

आयकर रिटर्नबाबत महत्त्वाची माहिती

पगारदार आणि नॉन-ऑडिट करदात्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. मात्र, आयटीआर-३ आणि आयटीआर-४ भरणाऱ्या स्वयंरोजगार व्यावसायिक, फ्रीलान्सर आणि लघुउद्योजकांना ३१ ऑगस्टपर्यंत रिटर्न भरता येणार आहे. त्यानंतर विलंब शुल्क लागू होऊ शकते.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच लागू झालेल्या या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिक, रेल्वे प्रवासी, बँक ग्राहक आणि करदात्यांवर होणार आहे. त्यामुळे संबंधित सेवा वापरण्यापूर्वी नव्या नियमांची माहिती करून घेणे फायद्याचे ठरेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

Mumbai : स्टेशन मास्तरांवर आणखी एक जबाबदारी! आता भटक्या कुत्र्यांवरही ठेवावी लागणार नजर

Thane : पॉड टॅक्सीचा 'तांत्रिक' अडथळा महिनाभरात दूर होणार; व्यवहार्यता अहवालासाठी स्वतंत्र सल्लागार संस्था; आयुक्त सौरभ राव यांचे आश्वासन

Mumbai : उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी समुद्रात जागा द्या; गणेशोत्सव समन्वय समितीची सरकारकडे मागणी

झोपडपट्टी पुनर्वसन धोरणात होणार बदल; SRA च्या अधिनियमाचे कार्याभिमुख लेखापरीक्षण; अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती