चैत्र नवरात्री येत्या ३० मार्चपासून सुरू होत आहे. या दरम्यान लोक उपवास ठेवतात. व्रत करतात. सलग नऊ दिवसांचे उपवास असल्याने उपवास काळात शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. तसेच उपवासानिमित्त घेण्यात येणारा फराळही योग्य आणि संतुलित असायला हवा. चैत्र नवरात्री हे उन्हाळ्यात येत असल्याने फराळासाठी योग्य ते पदार्थ घ्यायला हवे. जाणून घेऊ नवरात्रीच्या उपवासाला कोणकोणते पदार्थ टाळायला हवे. जेणेकरून उपवास योग्य प्रकारे करता येईल.
साबुदाणा वडा खाणे टाळा
नवरात्रीच्या उपवासासाठी अनेक वेळा आपण साबुदाण्याचे वडे करतो. मात्र, साबुदाणा वडे हे तुपात तळलेले असतात. तसेच साबुदाणा हा पचण्यास जड असतो. उन्हाळ्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. कारण उपवासात आपण अन्य पदार्थ खात नाही. त्यामुळे अपचन होऊ शकते. त्यामुळे शक्यतो चैत्र नवरात्रीच्या काळात उपवासात साबुदाणा वडा खाणे टाळावे.
बटाट्याचे वेफर्स आणि अन्य पदार्थ
बटाट्यामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणात असते. उपवासात आपण अन्य कोणतेही पदार्थ खात नाही. अशा वेळी उपवासात तुम्ही जर बटाट्याचे वेफर्स किंवा ऊसळ असे पदार्थ खाणार असाल तर ते टाळायला हवे. कारण यामुळे पोटात गॅस वाढण्याची शक्यता अधिक असते किंवा हे पदार्थ जर आहारात घेतले तर पोट जड पडण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे असा आहार शक्यतो टाळावा.
तेलकट पदार्थ टाळावे
उन्हाळा असल्यामुळे उपवासात कोणतेही तेलकट पदार्थ घेणे टाळावे. कारण यामुळे उलटी येणे, मळमळ होणे, डोके गरगरणे असे त्रास होऊ शकतात.
किती वेळाने पदार्थ खावे?
उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काही जण निरंकार उपवास करतात. केवळ पाणी पिऊन उपवास करतात. तर काही जण फलाहार करून उपवास करतात. तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. त्यामुळे सामान्यपणे उपवासाचे पदार्थ खाताना किमान ४ ते ५ तासाचे अंतर ठेवा. एकाच वेळी आहार घेऊ नका. यामुळे तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करताना ऊर्जा टिकवून ठेवता येईल.
कोणते पदार्थ खावे?
उपवासासाठी भगर, रताळू, फळे, दूध हा आहार उत्तम असू शकतो. या आहारामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वे मिळतील. उपवास करण्याचे फायदेही मिळतील.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)