Photo- Yandex
लाईफस्टाईल

रोज मद्याचा प्याला वाढवतो तोंडाच्या कर्करोगाचा धोका - टाटा मेमोरियलचा अभ्यास

सध्या नाताळ आणि नववर्षाच्या सणासुदीच्या काळात मद्यपान वाढण्याची शक्यता असताना, टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत खारघर येथील कर्करोग महामारी शास्त्र केंद्राने केलेल्या महत्त्वपूर्ण अभ्यासात गंभीर इशारा देण्यात आला आहे.

Swapnil S

अमित श्रीवास्तव/मुंबई : सध्या नाताळ आणि नववर्षाच्या सणासुदीच्या काळात मद्यपान वाढण्याची शक्यता असताना, टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत खारघर येथील कर्करोग महामारी शास्त्र केंद्राने केलेल्या महत्त्वपूर्ण अभ्यासात गंभीर इशारा देण्यात आला आहे. अगदी कमी प्रमाणात आणि नियमित मद्यसेवन केल्यासही तोंडाच्या पोकळीतील कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

बीएमजी ग्लोबल हेल्थ या मुक्त प्रवेश असलेल्या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या तुलनात्मक अभ्यासात २०१० ते २०२१ या कालावधीत ३७०६ पुरुषांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी १८०३ जणांना गालाच्या आतल्या भागातील कर्करोगाचे निदान झाले होते, तर १९०३ जण रोगमुक्त होते. संशोधकांच्या निष्कर्षानुसार, दररोज फक्त एक मद्याचा पेला घेतल्यास बक्कल म्यूकोसा कर्करोगाचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी वाढतो.

मद्यपान न करणाऱ्यांच्या तुलनेत मद्यपान करणाऱ्यांमध्ये बक्कल म्यूकोसा कर्करोगाचा धोका ६८ टक्क्यांनी अधिक आढळला. अभ्यासात बीयर, व्हिस्की, व्होडका, वाईन आणि रम—तसेच स्थानिक पातळीवर तयार होणारी महुआ, ताडी, देसी दारू आणि थर्रा यांचा समावेश होता. स्थानिक देशी दारूंशी सर्वाधिक धोका संबंधित आढळला; त्यांपैकी काहींमध्ये अल्कोहोलचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत असू शकते.

या अभ्यासाच्या प्रमुख वरिष्ठ लेखिका आणि वैज्ञानिक अधिकारी डॉ. शरयू म्हात्रे म्हणाल्या, ‘आतापर्यंतचे बहुतांश संशोधन युरोप आणि उत्तर अमेरिकेतून आलेले आहे. मद्यसेवन स्थानिक देशी दारू आणि तोंडाच्या पोकळीतील कर्करोग यांमधील संबंध तपासणारा भारतातील हा पहिला मोठ्या प्रमाणावरील बहुकेंद्रित अभ्यास आहे. भारतात मद्य आणि तंबाखू अनेकदा एकत्र वापरले जातात, मात्र मद्याचा स्वतंत्र परिणाम पुरेशा सखोलतेने अभ्यासलेला नव्हता.’

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, मद्यपान आणि तंबाखू चघळणे या दोन्हींचा एकत्रित परिणाम तोंडाच्या कर्करोगाच्या धोक्यावर स्पष्टपणे दाखवणारा हा पहिला अभ्यास आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (आयएआरसी) मद्याला ‘ग्रुप १’ कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत करते आणि ते किमान सात प्रकारच्या कर्करोगांशी संबंधित आहे, याची त्यांनी आठवण करून दिली. जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत ते म्हणाले, ‘मद्यनियंत्रणावरील कडक धोरणे ही सर्वात शहाणी गुंतवणूक ठरू शकतात.’

भारतात मद्यपानासोबत तंबाखू चघळण्याच्या सवयीमुळे धोका आणखी वाढतो. जे लोक मद्यपान करतात आणि तंबाखूही चघळतात, त्यांच्यात कर्करोगाचा धोका दोन्ही न वापरणाऱ्यांच्या तुलनेत चारपट अधिक आढळला. संशोधकांच्या मते, मद्यामुळे तोंडाच्या आतील आवरणात बदल होते. त्यामुळे चघळण्याच्या तंबाखूमधील कर्करोगकारक घटकांचा परिणाम अधिक तीव्र होतो.

कर्करोग महामारीशास्त्र केंद्राचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी सांगितले की, भारतातील सुमारे ११.५ टक्के बक्कल म्यूकोसा कर्करोगाच्या प्रकरणांना मद्यपान कारणीभूत आहे.

अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, तेलंगणा आणि मध्य प्रदेश यांसारख्या उच्च-जोखमीच्या राज्यांमध्ये हे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे. याउलट, गुजरातसारख्या राज्यांमध्ये—जिथे मद्यविक्रीवर बंदी आहे. तेथे मद्याशी संबंधित धोका तुलनेने खूप कमी दिसून येतो.

धोरणात्मक उणिवांकडे लक्ष वेधत एसीटीआरईसीचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी मद्यनियंत्रण उपाय अधिक बळकट करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. “बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी मद्य किंवा तंबाखू उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांचा प्रचार करतात, ही दुर्दैवी बाब आहे. ते वेगवेगळ्या उत्पादनांचा प्रचार करतात, पण त्यांची चिन्हे मद्य किंवा तंबाखू उत्पादनांसारखीच असतात,” असे ते म्हणाले.

तोंडाचा कर्करोग हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. दरवर्षी सुमारे १.४३ लाख नवे रुग्ण आणि जवळपास ८० हजार मृत्यू नोंदवले जातात. पाच वर्षांनंतर जिवंत राहणाऱ्यांचे प्रमाण निम्म्याहून कमी असल्याने या आजारातील मृत्युदर चिंताजनक आहे.

अभ्यासाचा निष्कर्ष मांडताना डॉ. शरयू म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, बक्कल म्यूकोसा कर्करोगाच्या बाबतीत मद्यपानाची कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही. मद्य आणि तंबाखू वापरावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रभावी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांद्वारे भारतातून हा कर्करोग मोठ्या प्रमाणात निर्मूलन करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

Thane : निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...