जगातील प्रत्येकजण आयुष्यभर तरुण आणि सुंदर दिसण्याचं स्वप्न पाहतो. अर्थातच वय वाढणं थांबवता येत नाही, पण वाढत्या वयाचं परिणाम त्वचेवर उमटू नयेत यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीचा मोठा वाटा असतो. पौष्टिक अन्न, पुरेशी झोप, हायड्रेशन आणि थोडंसे व्यायाम यांसोबत काही ड्रायफ्रूट्स रोजच्या आहारात घेतले, तर त्वचा अधिक काळ तजेलदार आणि निरोगी राहू शकते.
डर्मेटॉलॉजिस्ट्सच्या मते, सुकामेव्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट्स हे त्वचेला आतून पोषण देतात, कोलेजन टिकवतात आणि वृद्धत्वाची चिन्हे जसे की सुरकुत्या, डाग, बारीक रेषा कमी करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स तरुणपण जपण्यासाठी सर्वात प्रभावी ठरतात?
१. बदाम - त्वचेला देतात नैसर्गिक संरक्षण
बदाम हे 'स्किनसाठी सुपरफूड' म्हणून ओळखले जातात. त्यात भरपूर व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात, जे त्वचेला सूर्यकिरणांपासून आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
व्हिटॅमिन ई त्वचेची लवचिकता टिकवून ठेवते आणि पेशींना दुरुस्त करते. रोज सकाळी भिजवलेले काही बदाम खाल्ल्यास किंवा बदामाचं दूध प्यायल्यास त्वचा मऊ, चमकदार आणि टवटवीत दिसते.
२. काजू - कोलेजन वाढवतात आणि त्वचेला करतात तजेलदार
काजू फक्त स्वादिष्ट नसतात, तर त्यात असलेले कॉपर आणि झिंक त्वचेत कोलेजन निर्मिती वाढवतात. कोलेजन हे त्वचेला घट्ट आणि तरुण ठेवण्यास महत्त्वाचे आहे. काजूमधील हेल्दी फॅट्स त्वचेला आतून मॉइश्चर देतात, त्यामुळे कोरडेपणा आणि राठपणा कमी होतो. रोज थोडेसे काजू खाल्ल्यास त्वचेला एक नैसर्गिक ग्लो मिळतो.
३. मनुके - डाग, सुरकुत्या आणि थकलेली त्वचा दूर करतात
मनुक्यामध्ये रेझवेराट्रॉल आणि फिनॉल हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. त्यामुळे सुरकुत्या कमी दिसतात आणि त्वचेचा रंग उजळतो. याशिवाय, मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन सी असतं जे त्वचेत नवा कोलेजन निर्माण करतं आणि तिला अधिक टवटवीत बनवतं. दररोज काही मनुके भिजवून खाल्ल्यास त्वचा आतून पोषित राहते.
सुकामेव्यांसोबत 'या' गोष्टी ठेवा लक्षात
दिवसभरात पुरेसं पाणी प्या.
पुरेशी झोप घ्या आणि रात्री त्वचेची स्वच्छता राखा.
तणाव कमी ठेवा; कारण ताणामुळे त्वचेवर वृद्धत्व लवकर येतं.
सुकामेवा नेहमी मर्यादेत खा – रोज मूठभर पुरेसं आहे.
तरुण आणि तेजस्वी त्वचेसाठी महागड्या क्रीम्सपेक्षा योग्य आहार अधिक प्रभावी ठरतो. बदाम, काजू आणि मनुके हे फक्त स्वादिष्ट नाहीत तर त्वचेला आतून बळकट करतात, पेशींना नवचैतन्य देतात आणि वाढत्या वयाचा प्रभाव कमी करतात.