सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांभोवती सूज दिसणे, पापण्या जड वाटणे किंवा डोळ्यांत जळजळ होणे, असा त्रास अनेकांना जाणवतो. काही वेळाने ही लक्षणे कमी होत असल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, अपुरी झोप, रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर, डोळ्यांचा कोरडेपणा किंवा अॅलर्जी यांसारख्या कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. काही वेळा सतत जाणवणारी सूज इतर आरोग्यविषयक समस्यांशीही संबंधित असू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळे जड होण्यामागील संभाव्य कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
१. अपुरी झोप आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर
रात्री उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्यामुळे झोपेच्या वेळेवर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. स्क्रीनकडे बराच वेळ एकटक पाहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होते. परिणामी डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप न झाल्यास सकाळी डोळ्यांभोवती सूज दिसणे किंवा पापण्या जड वाटणे शक्य आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करणे आणि नियमित झोपेची वेळ पाळणे फायदेशीर ठरू शकते.
२. डोळ्यांमधील कोरडेपणा
डोळ्यांच्या पृष्ठभागावर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी अश्रूंची गरज असते. अश्रूंचे प्रमाण कमी होणे किंवा ते लवकर वाळणे यामुळे डोळे कोरडे पडू शकतात. अशा वेळी डोळ्यांत काहीतरी गेल्यासारखे वाटणे, जळजळ होणे, लालसरपणा किंवा थकवा जाणवू शकतो. झोपताना पापण्या पूर्णपणे बंद न होणे आणि काही पर्यावरणीय घटक यांचाही या त्रासाशी संबंध असू शकतो.
३. डोळ्यांची ॲलर्जी
धूळ, परागकण, उशीवरील धुळीचे कण किंवा पाळीव प्राण्यांशी संबंधित अॅलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांभोवती सूज येणे, खाज सुटणे, पाणी येणे किंवा लालसरपणा जाणवू शकतो. सकाळी उठल्यावर ही लक्षणे अधिक जाणवत असतील, तर झोपण्याची जागा आणि अंथरुणाची स्वच्छता याकडे लक्ष द्या. मात्र, वारंवार त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४. पापण्यांची जळजळ म्हणजेच ब्लेफरायटिस
ब्लेफरायटिस (पापण्यांच्या कडांची जळजळ) या समस्येमध्ये पापण्यांच्या मुळाशी दाह निर्माण होतो. पापण्यांच्या कडांवर खपल्या जमा होणे, चिकटपणा जाणवणे, डोळ्यांत जळजळ होणे आणि सकाळी पापण्या एकमेकांना चिकटल्यासारख्या वाटणे, अशी लक्षणे दिसू शकतात. हा त्रास वारंवार होत असल्यास नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
५. मूत्रपिंड किंवा थायरॉईडशी संबंधित समस्या
डोळ्यांभोवतीची सूज प्रत्येक वेळी गंभीर आजारामुळेच येते असे नाही. मात्र, पुरेशी झोप घेऊनही आणि दैनंदिन सवयी सुधारूनही सूज कायम राहत असेल, तर तिचे कारण तपासून घेणे महत्त्वाचे आहे. मूत्रपिंडांच्या काही आजारांमध्ये शरीरात द्रव साचल्यामुळे डोळ्यांभोवती सूज दिसू शकते. तसेच थायरॉईडशी संबंधित काही विकारांमध्येही डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. केवळ या लक्षणावरून कोणताही आजार निश्चित करता येत नाही; त्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.
सकाळी डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काय कराल?
डोळ्यांवर काही वेळ स्वच्छ, थंडसर कापडाची हलकी पट्टी ठेवा.
दररोज पुरेशी झोप घ्या आणि झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करा.
आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि दिवसभर पुरेसे पाणी प्या.
ॲलर्जीचा त्रास असल्यास धूळ आणि इतर संभाव्य कारणांपासून शक्य तितके दूर राहा.
डोळे चोळणे टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी आय ड्रॉप्स वापरू नका.
कधी डॉक्टरांकडे जावे?
डोळ्यांची सूज वारंवार येत असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल, तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. डोळ्यांत तीव्र वेदना, अचानक दृष्टी कमी होणे, दृष्टी धूसर होणे किंवा डोळ्याभोवती मोठ्या प्रमाणात लालसरपणा आणि सूज दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.
(डिस्क्लेमर : ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. डोळ्यांची सूज किंवा जडपणा यामागील नेमके कारण समजून घेण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)