Ganeshotsav 2026 : मोदकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय? बनवा ओल्या नारळाची स्वादिष्ट करंजी, नोट करा सोपी रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2026 : मोदकांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय? बनवा ओल्या नारळाची स्वादिष्ट करंजी, नोट करा सोपी रेसिपी

बाहेरून कुरकुरीत आणि आतून ओल्या नारळाच्या गोड सारणामुळे ही करंजी खायला अतिशय स्वादिष्ट लागते.

किशोरी घायवट-उबाळे

गणेशोत्सव म्हटलं की घराघरात उत्साह, आनंद आणि गोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक, पुरणपोळी, लाडू यांसह विविध पारंपरिक पदार्थ आवर्जून केले जातात. त्यात ओल्या नारळाची करंजी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून ओल्या नारळाच्या गोड सारणामुळे ही करंजी खायला अतिशय स्वादिष्ट लागते. गणेशोत्सवाच्या दिवसांत पाहुण्यांसाठी किंवा बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हीही घरच्या घरी ही करंजी नक्की करून पाहू शकता.

साहित्य :

करंजीच्या आवरणासाठी -

  • २ वाट्या मैदा

  • २ चमचे रवा

  • २ चमचे तूप

  • चिमूटभर मीठ

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • तळण्यासाठी तेल

सारणासाठी -

  • २ वाट्या ताजा किसलेला ओला नारळ

  • १ वाटी साखर

  • १ चमचा तूप

  • २ ते ३ वेलची पूड

  • १ चमचा खसखस

  • २ चमचे काजू-बदामाचे तुकडे

  • थोडे मनुके

  • १ चमचा दूध किंवा खवा (ऐच्छिक)

कृती :

१. पीठ मळून घ्या : सर्वप्रथम एका परातीत मैदा, रवा, मीठ आणि तूप घ्या. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. त्यानंतर थोडे-थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. पीठावर थोडे तूप लावून ते १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.

२. नारळाचे सारण तयार करा : कढईत तूप गरम करून त्यात खसखस आणि काजू-बदामाचे तुकडे हलके भाजून घ्या. त्यानंतर त्यात किसलेला ओला नारळ आणि साखर घाला. हे मिश्रण मध्यम आचेवर सतत हलवत शिजवा.

३. सारण कोरडे होऊ द्या : नारळातील पाणी आटू लागले की त्यात वेलची पूड आणि मनुके घाला. सारण पूर्णपणे कोरडे होऊ देऊ नका. थोडे ओलसर आणि घट्टसर राहू द्या. गॅस बंद करून सारण पूर्णपणे थंड होऊ द्या.

४. करंज्या तयार करा : मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून त्याच्या पातळ पुरी लाटून घ्या. त्यात एक ते दीड चमचा नारळाचे सारण भरा. पुरी अर्धी दुमडून कडांना पाणी लावून व्यवस्थित बंद करा. करंजीला कातणीने किंवा साच्याने सुंदर आकार देता येईल.

५. करंज्या तळून घ्या : कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवा. तयार केलेल्या करंज्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या करंज्या टिश्यूवर किंवा जाळीवर काढा.

टिप्स :

  • सारणात साखर घातल्यानंतर ते जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा सारण खूप कोरडे होऊ शकते.

  • सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच करंजीत भरा.

  • करंजीच्या कडा व्यवस्थित बंद करा, म्हणजे तळताना सारण बाहेर येणार नाही.

  • तेल खूप गरम असल्यास करंजी बाहेरून पटकन लाल होईल आणि आतून नीट तळली जाणार नाही.

  • करंजी मध्यम आचेवर तळल्यास ती छान कुरकुरीत होते.

  • ताज्या ओल्या नारळामुळे करंजी लवकर खराब होऊ शकते, त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवून शक्यतो लवकर खावी.

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा