गणेशोत्सव म्हटलं की मोदक हवाच. मात्र, गोड पदार्थ खाण्याची इच्छा असली तरी डाएटमुळे अनेक जण मोदक खाणं टाळतात. अशावेळी चव आणि आरोग्याचा समतोल साधण्यासाठी ड्रायफ्रूट्सपासून बनवलेले पौष्टिक मोदक हा एक पर्याय ठरू शकतो. बदाम, काजू, अक्रोड आणि खजूर यांसारख्या पदार्थांचा वापर करून हे मोदक घरच्या घरी सहज तयार करता येतात. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.
साहित्य :
कव्हरसाठी -
१ कप तांदळाचे पीठ
१ कप पाणी
१ चमचा तूप
चिमूटभर मीठ
सारणासाठी -
१ कप किसलेले खोबरे
४ ते ५ खजूर बारीक चिरलेले
१ चमचा गूळ
२ चमचे बारीक चिरलेले बदाम
२ चमचे बारीक चिरलेले काजू
१ चमचा खसखस
अर्धा चमचा वेलची पूड
१ चमचा तूप
कृती :
सर्वप्रथम कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात खसखस, बदाम आणि काजू हलके भाजून घ्या. त्यानंतर त्यात किसलेले खोबरे, बारीक चिरलेले खजूर आणि गूळ घालून मंद आचेवर परतून घ्या. मिश्रणाला छान सुगंध आला की त्यात वेलची पूड घालून गॅस बंद करा. सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
आता मोदकाच्या आवरणासाठी एका भांड्यात पाणी, तूप आणि मीठ घालून उकळी आणा. उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित ढवळा. गॅस बंद करून हे मिश्रण काही मिनिटे झाकून ठेवा. पीठ कोमट झाल्यावर हाताला थोडे तूप लावून ते मऊसर मळून घ्या.
मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन हाताने त्याची पातळ वाटी तयार करा. त्यात तयार केलेले सारण भरून कडा अलगद बंद करत मोदकाचा आकार द्या. अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करा.
तयार मोदक इडलीपात्र किंवा मोदकपात्रात ठेवून साधारण १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. मोदक व्यवस्थित शिजल्यानंतर त्यावर थोडे तूप सोडून मोदकाचा आस्वाद घेता येईल.
टिप्स :
साखरेऐवजी खजूर किंवा कमी प्रमाणात गूळ वापरल्याने गोडवा मिळतो.
सारणात बदाम, काजू, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रूट्स घातल्याने पोषणमूल्य वाढते.
मोदक तळण्याऐवजी वाफवून घेतल्यास अतिरिक्त तेल टाळता येते.
गोडवा कमी ठेवायचा असल्यास गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी करता येते.
मोदकाचे आवरण शक्यतो पातळ ठेवावे, त्यामुळे सारणाची चवही उठून येते.
डाएट मोदक असला तरी प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.
मधुमेह किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास गूळ, खजूर आणि इतर गोड पदार्थांचे प्रमाण ठरवताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)