गणपतीचे दिवस जवळ आले की मुंबईकरांची गावी जाण्याची लगबग सुरू होते. कोकणात जायचं असेल किंवा इतर कुठे ट्रिपचा प्लॅन असेल, घर बंद करण्याआधी साफसफाई, खिडक्या-दारे बंद करणं, गॅस कनेक्शन तपासणं अशा अनेक गोष्टी केल्या जातात. याच यादीत फ्रीजही येतो. घर १०-१२ दिवस बंद राहणार असल्याने अनेकजण फ्रीजमधलं सामान काढून थेट प्लग काढतात आणि निघून जातात. पण फ्रीज बंद करण्याचीही योग्य पद्धत आहे. ती न पाळल्यास परत आल्यानंतर फ्रीजमधून कुबट वास येण्यासोबतच बुरशी आणि साफसफाईचा त्रास होऊ शकतो.
काही दिवसांचीच ट्रिप असेल तर?
तुम्ही ३ ते ४ दिवसांसाठी बाहेर जाणार असाल तर फ्रीज पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते. त्याऐवजी कुलिंग 'लो' किंवा 'मिनिमम'वर ठेवता येते. मात्र, दूध, उरलेलं जेवण, कापलेल्या भाज्या यांसारखे लवकर खराब होणारे पदार्थ आधीच काढून टाका.
१०-१२ दिवसांसाठी घर बंद ठेवणार असाल तर...
गणपतीसाठी किंवा लांब ट्रिपसाठी घर अनेक दिवस बंद राहणार असेल तर फ्रीज रिकामा करून बंद करणं योग्य ठरू शकतं. फ्रीज आणि फ्रिझरमधील सर्व पदार्थ बाहेर काढा. फ्रीज बंद केल्यानंतर आतला बर्फ पूर्णपणे वितळू द्या आणि साचलेलं पाणी व्यवस्थित पुसून फ्रीज कोरडा करा.
फ्रीजचा दरवाजा मात्र उघडा ठेवा!
ही गोष्ट विसरू नका. फ्रीज बंद केल्यानंतर त्याचा दरवाजा पूर्णपणे बंद करू नका. तो किंचित उघडा राहील अशी व्यवस्था करा. त्यामुळे आत हवा खेळती राहते आणि बुरशी किंवा कुबट वास निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
फ्रीजमध्ये 'हॉलिडे मोड' आहे का?
आजकालच्या अनेक फ्रीजमध्ये 'हॉलिडे मोड' किंवा 'इको मोड' असतो. तुमच्या फ्रीजमध्ये ही सुविधा असेल तर बाहेर जाताना तिचा वापर करता येतो. तसेच तुमच्या परिसरात वारंवार वीज जाण्याची समस्या असेल, तर घर अनेक दिवस बंद ठेवताना फ्रीज बंद करण्याचा पर्याय अधिक सुरक्षित ठरू शकतो.
म्हणून यंदा गणपतीला गावी निघताना घरातील सगळ्या तयारीसोबत फ्रीजचीही योग्य तयारी करा; नाहीतर परतल्यावर गणपतीच्या आनंदाऐवजी फ्रीज साफ करण्याची कटकट सुरू होईल!