अनेकदा आपण गुगल अकाउंटचा पासवर्ड विसतो आणि अकाउंट लॉग-इन करता येत नाही. अशावेळी अकाउंट परत मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी गुगलने 'सेल्फी व्हिडिओ' हे नवे फीचर सुरू केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमची ओळख व्हिडिओद्वारे सिद्ध करून पुन्हा अकाउंटचा अॅक्सेस मिळवू शकणार आहात.
काय आहे 'सेल्फी व्हिडिओ' फीचर?
गुगल अकाउंटच्या सिक्युरिटी सेटिंगमध्ये एक छोटा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायचा आहे. भविष्यात पासवर्ड विसरला, मोबाईल हरवला किंवा अकाउंटमध्ये लॉग-इन करता आले नाही, तर पुन्हा एक सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल. गुगल हा नवीन व्हिडिओ आधी सेव्ह केलेल्या व्हिडिओशी पडताळून पाहील. दोन्ही जुळल्यास अकाउंटचा अॅक्सेस पुन्हा मिळेल.
सेल्फी व्हिडिओ कसा सेट करायचा?
Google Account Settings उघडा.
Security विभागात जा.
Sign-in & Security पर्याय निवडा.
Selfie Video पर्यायावर क्लिक करा.
स्क्रीनवरील सूचनांनुसार कॅमेऱ्याकडे पाहून डोके हलवत छोटा व्हिडिओ रेकॉर्ड करा.
तुमचा व्हिडिओ सुरक्षित राहणार?
गुगलच्या माहितीनुसार, हा सेल्फी व्हिडिओ एन्क्रिप्टेड स्वरूपात सेव्ह केला जातो. तो फक्त अकाउंट रिकव्हरीसाठीच वापरला जाईल. वापरकर्त्याला हवा असल्यास हा व्हिडिओ कधीही डिलीट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
डीपफेकपासूनही संरक्षण
अकाउंट रिकव्हरीदरम्यान गुगलचे मशीन लर्निंग तंत्रज्ञान हा व्हिडिओ खऱ्या व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे की नाही, याची पडताळणी करते. फोटो, बनावट व्हिडिओ किंवा डीपफेकच्या मदतीने अकाउंट मिळवण्याचा प्रयत्न ओळखण्याची क्षमताही या प्रणालीमध्ये आहे.
जुने पर्यायही कायम
सेल्फी व्हिडिओ फीचरमुळे गुगलचे इतर सुरक्षा पर्याय बंद होणार नाहीत. पासकी (Passkeys), टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA), सिक्युरिटी की आणि इतर सुरक्षा सुविधा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहतील. हे फीचर अकाउंट रिकव्हरीसाठी आणखी एक सुरक्षित पर्याय म्हणून जोडण्यात आले आहे.
(Disclaimer : ही माहिती गुगलने जाहीर केलेल्या फीचरविषयी उपलब्ध अधिकृत माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. फीचरची उपलब्धता देश, डिव्हाइस आणि गुगल अकाउंटच्या प्रकारानुसार बदलू शकते.)