उन्हाळा लागला की अनेकवेळा पाणी पिऊन ही वारंवार तहान लागते. तसेच उकाड्यामुळे काही तरी गार प्यावेसे वाटते. आपसूकच आपली पावले शीतपेय पिण्याकडे वळतात. मात्र, या शीतपेयांचे गंभीर दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. जाणून घेऊ याविषयी सविस्तर माहिती.
शीतपेय बनवताना एक मोठी प्रक्रिया करण्यात येते. यामध्ये विविध प्रकारचे रासायनिक घटक वापरण्यात येतात. यामध्ये विविध प्रकारची कृत्रिम रंग, साखरेचा अतिरिक्त वापर, अस्पारटम, फॉस्फोरिक ॲसिड इत्यादी घटकांचा समावेश होतो. कार्बोनिक ॲसिडद्वारे शीतपेयातील कार्बन डायऑक्साइड वापरले जाते. फॉस्फोरिक ॲसिडमुळे शीतपेय हे आम्लतेत वाढ होते. शीतपेयांमधील या सर्व घटकांचे आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात.
स्थूलता वाढणे
शीतपेयांमध्ये साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उन्हाळ्यात सातत्याने शीतपेय पिल्यास शरीरात साखरेचे प्रमाणे वाढते. परिणामी वजन वाढून लठ्ठपणा किंवा स्थूलतेचा आजार जाणवतो. स्थूलता ही आज जगभरातील मोठी समस्या बनत चालली आहे. स्थूलतेमुळे रक्तदाब वाढणे, थकवा वाढणे, हृदयविकार होऊ शकतात.
हाडांवर होणारे दुष्परिणाम
शीतपेयातील अत्याधिक साखरेमुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका असतो. यातील रासायनिक घटकांमुळे हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. तसेच कॉपर, झिंक आणि क्रोमिअम या धातूंची कमतरता होते.
शीतपेयांमधील फॉस्फोरिक ॲसिडमुळे शरीरातील पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमचे संतुलन बिघडते. याचे थेट परिणाम हाडांवर होतो. परिणामी गुडखे दुखणे, पाय दुखणे, अंग दुखणे वाढते.
अपचन होणे
शीतपेय जास्त प्रमाणात पिल्यामुळे अपचन होणे किंवा अजीर्ण होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी शीतपेयांमधील विविध घटक कारणीभूत ठरतात. अपचन झाल्यामुळे पोटाशी संबंधित विविध व्याधी जडू शकतात.
शीतपेयाला हे आहेत पर्याय
शीतपेय पिण्याचे आपण टाळू शकतो. त्याला अनेक चांगली पेय पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. यामध्ये नारळ पाणी, ताक, लस्सी, उसाचा रस, कैरी पन्हं, कलिंगड किंवा टरबूजचे ज्यूस, लिंबू सरबत, उसाचा रस (बर्फ न घातलेला) हे शीतपेयांना काही पर्याय आहेत. याचा तुम्ही उन्हाळी पेयांमध्ये समावेश करू शकतात.